आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपा-सेना युतीतर्फे  शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे या लढतीतील चुरस वाढणार आहे. कॉंग्रेस आघाडीतर्फे  या मतदारसंघातून कॉंग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. नीलेश राणे यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर झाली आहे. भाजपा-सेना युतीच्या जागावाटपामध्ये ही जागा सुरुवातीपासून सेनेच्या वाटय़ाला आली आहे. १९९९ व २००४ च्या निवडणुकांमध्ये येथून शिवसेनेचे सुरेश प्रभू यांनी विजय मिळवला, पण गेल्या (२००९) राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश यांनी प्रभूंचा सुमारे ४६ हजार मतांनी पराभव केला. आगामी निवडणुकीसाठीही सुरुवातीला प्रभू यांचे नाव चर्चेत होते. पण सेनेचे सचिव आमदार राऊत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत सातत्याने संपर्क ठेवून उमेदवारीसाठी हक्क निर्माण केला. या दोन जिल्ह्य़ांमधील सेनेच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांकडूनही राऊत यांच्याच नावाला जास्त पसंती होती. त्यामुळे अखेर युतीचे या मतदारसंघातील उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली.
या मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्य़ात जिल्हा परिषद, दापोली, रत्नागिरी व राजापूर नगर परिषद, पंचायत समित्या इत्यादी प्रमुख सत्ता केंद्रांमध्ये सध्या भाजपा-सेना युतीचे वर्चस्व आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सावंतवाडी नगर परिषद वगळता सर्व ठिकाणी राणेप्रणीत कँाग्रेसची पकड आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील ५ विधानसभा मतदारसंघांपैकी ३ जागा भाजप सेना युतीकडे आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ३ जागांपैकी फक्त १ जागा कँाग्रेसच्या पदरात पडली. तेथून खुद्द नारायण राणे विजयी झाले होते. मागील लोकसभा निवडणुकीतही ४६ हजार मतांच्या आघाडीपैकी तब्बल २६ हजार मते कणकवली विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती. हे चित्र लक्षात घेता जागा राखण्यासाठी कँाग्रेस आघाडीला या वेळी कसून प्रयत्न करावे लागणार, हे उघड आहे.
    माजी खासदार सुरेश प्रभू निवडून आले त्यावेळी या मतदारसंघाची रचना वेगळी होती. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्य़ांसाठी दोन स्वतंत्र मतदारसंघ होते. गेल्या निवडणुकीपूर्वी मतदारसंख्येनुसार झालेल्या फेररचनेत या दोन जिल्ह्य़ांचा मिळून एकच मतदारसंघ झाला आहे. या मतदारसंघाचे चिपळूण ते सावंतवाडी हे अंतर सुमारे ३५० किलोमीटर आहे. शिवाय मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूंना आतमध्ये काही किलोमीटर अंतरापर्यंत वाडय़ा-वस्त्या पसरलेल्या आहेत. त्यामुळे प्रचारासाठी फिरताना उमेदवारांची दमछाक होते. अशा वेळी गावपातळीपर्यंतचे कार्यकर्त्यांचे जाळे जास्त प्रभावी ठरते. शिवसेना त्याबाबतीत सरस आहे. शिवाय कोकणची मुंबईशी जोडलेली नाळही सेनेला उपयोगी पडते. पण मागील निवडणुकीत या बाबींचा लाभ उठवता आला नव्हता. आता खुद्द कोकणचे संपर्कप्रमुख असलेले राऊत रिंगणात उतरले असल्यामुळे ते या यंत्रणेचा जास्त चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतील, अशी अपेक्षा आहे. तसेच प्रभूंची स्वच्छ, सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषित अशी प्रतिमा पक्षाबाहेरची मते मिळवण्यासाठी उपयोगाची असली तरी पक्षांतर्गत यंत्रणा राबवण्याबाबत ते इतरांवर अवलंबून होते. म्हणूनच सेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या राजापूर विधानसभा मतदारसंघात प्रभूंना जेमतेम पाचशे मतांची आघाडी मिळाली होती.
    सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात राणेंचे पूर्वीपासून वर्चस्व असले तरी गेल्या पाच वर्षांत परिस्थितीमध्ये बराच फरक पडला आहे. एके काळी या जिल्ह्य़ात मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर विरोधकांचे बूथही नसायचे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी प्रचंड कष्ट करून पुन्हा सेनेचे जिल्ह्य़ात जाळे निर्माण केले आहे. गेल्याच आठवडय़ात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळी त्याचा अनुभव आला. शिवाय राष्ट्रवादी कँाग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता मिळालेल्या वेंगुर्ला नगर परिषदेत राणेंनी सुरुंग लावल्यामुळे केसरकर कमालीचे अस्वस्थ आहेत. त्यातून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची धमकी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातही राष्ट्रवादी कँाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि राणे पिता-पुत्रांमधील ‘सख्य’ सर्वज्ञात आहे.
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेना यांच्यात सध्या बेरजेचे राजकारण रंगले आहे. या सर्व बाबींचा युतीचे उमेदवार राऊत कशा प्रकारे फायदा उठवतात, यावर निवडणुकीतील रंगत अवलंबून आहे. राणे पिता-पुत्रांच्याही दृष्टीने ही राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. तसेच स्वत: नारायण राणे या प्रदेशाच्या राजकारणात मुरलेले राजकारणी आहेत. राऊत यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीतील चुरस निश्चितपणे वाढली आहे.