राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रामाचे नाव घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे. फडणवीस यांना वैफल्याने ग्रासल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे, अशी टीका शिवसेनेनं केलीय, अशी टीका शिवसेनेनं केली आहे. फडणवीस यांनी रविवारी मुंबईत घेतलेल्या सभेमधून शिवसेनेवर हल्लाबोल केल्यानंतर आज शिवसेनेनं फडणवीसांवर निशाणा साधताना त्यांची तुलना थेट विभीषणाशी केली आहे. शिवसेनेच्या टीकेला भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. विभीषण हा रामराज्य आणण्यासाठी भावाविरोधात लढत होता अशी आठवण करुन देत भाजपाने शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत.

शिवसेनेनं नेमकं काय म्हटलंय?
फडणवीसांच्या सभेवरुन भाजपा आणि विरोधी पक्ष नेत्यांवर निशाणा साधताना शिवसेनेनं फडणवीसांना विभीषण म्हटलंय. “फडणवीस हे उत्तर भारतीयांच्या सभेत बरेच बोलून गेले. त्यांनी टोमणे मारण्याचा प्रयत्न केला. तेही जमले नाही. मराठी लोकांची सभा असली की, ते वेगळे बोलतात व हिंदी भाषिकांच्या सभेत ते दुसरेच बोलतात. कालच्या सभेत त्यांनी ‘हनुमान चालिसा’ वाचली. पायात चपला घालून ‘हनुमान चालिसा’ वाचण्याची आपली परंपरा नाही हे भाजपावाल्यांना कोणीतरी सांगायला हवे. उत्तर भारतीय श्रीराम व हनुमानाचे भक्त आहेत. श्रीरामाचे वास्तव्य महाराष्ट्रात होते,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

“नाशिकचे पंचवटी आणि नागपूरजवळील रामटेक हे प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झाले, पण नागपूरच्या फडणवीसांनी श्रीरामाचा सत्यवचनाचा गुण घेतलेला दिसत नाही. ते सध्या फक्त खोटे आणि खोटेच बोलत आहेत. राज्य सोडावे लागले तेव्हा श्रीरामाने तो निर्णय स्वीकारला. त्यांना वैफल्य आले असे रामायणात कोठेच दिसत नाही. सीतामाईनेही तो निर्णय स्वीकारला हे विशेष, पण फडणवीसांची रामभक्ती तकलादू आहे. नाव रामाचे घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे. फडणवीस यांना वैफल्याने ग्रासल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे हे मात्र नक्की,” असा टोला शिवसेनेनं लागवलाय.

भाजपाचे प्रत्युत्तर
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेच्या या टीकेला उत्तर देताना आम्ही बिभीषण मग तुम्ही रावण?, मथळ्याखाली पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी रामायणातील संदर्भ दिलाय. “‘सामना’चे कार्यकारी संपादक व राष्ट्रवादीचे शिवसेनेतील प्रवक्ते देवेंद्रजीना “नाव रामाचे घेतात अन् बिभीषणाप्रमाणे वागतात” असं म्हणतात, अहो, बिभीषण हा रामभक्तच होता. रावणासोबत राहून त्याने कधीही रामाची भक्ती सोडली नाही. रावणाने जो अत्याचार केला त्याविरोधात जाऊन ते प्रभू रामाच्या सैन्यासोबतच रावणाविरोधात युद्धात उभे राहिले. वाईट मार्गाला लागलेल्या भावालाही त्याने सोडले नाही. तुम्ही इतकी वर्ष याच बिभीषणासोबत एकत्र होता. मग तुम्ही कोण ‘रावण’? हो हेच सत्य आहे,” असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

“भ्रष्टवाद्यांना हाताशी धरून तुम्ही राज्याचा कारभार रसातळाला नेला. खुलेआम वसुली होऊ लागली. बदल्यांच्या रॅकेट तयार झाले. पुरावा नष्ट करण्यासाठी हत्या करण्यापर्यंत मजल गेली. राज्याच्या कारभाराचे तीन तेरा वाजले. तुमच्या अहंकाराची लंका जाळून हा बिभीषण महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी लढतोय. त्यामुळे वाचाळवीरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे,” असा शब्दांमध्ये उपाध्ये यांनी शिवसेनेच्या टीकेवर उत्तर दिलंय.

ठाकरे नसते तर महाराष्ट्रात…
दरम्यान, शिवसेनेनं फडणवीसांवर टीका करताना ठाकरेंमुळे महाराष्ट्रामध्ये मराठी स्वाभिमान टाकून असल्याचं म्हटलंय. “फडणवीस यांना स्वतःच्या राज्यातले चांगले काहीच दिसत नाही. उत्तर भारतीयांच्या सभेत त्यांनी गंगेत वाहत गेलेल्या हजारो प्रेतांवर भाष्य केले नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून जे लाखो उत्तर भारतीय कोविड काळात उत्तर प्रदेशात गेले, त्यांना योगींच्या भाजपा सरकारने राज्यात प्रवेश करू दिला नाही. चार दिवस वेशीवरच अन्नपाण्याशिवाय उपाशी ठेवले. या अमानुष वागण्यावर श्रीरामही दुःखी झाले, पण फडणवीस यांच्या मनातला ‘राम’ जागा झाला नाही. हे कसले लक्षण समजायचे? सत्ता गेल्याचा इतका मानसिक परिणाम व्हावा? वाघाचे फोटो काढून वाघ होता येत नाही, निधड्या छातीने संकटाचा मुकाबला करावा लागतो असे त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सुनावले आहे. शिवसेना म्हणजे वाघावर स्वार झालेल्या मर्दांचा पक्ष आहे व आज उद्धव ठाकरे त्यांचे नेतृत्व करीत आहेत. ठाकरे नसते तर महाराष्ट्रात मराठी स्वाभिमान व अस्मिता खतमच झाली असती. शिवसेनेने बलिदाने दिली व समस्त ठाकरे कुळाने वाघाच्या छातीने संघर्ष केला म्हणून आज मुंबईसह महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता उभा आहे,” असा उल्लेख ‘सामना’च्या अग्रलेखात आहे.

मुंबई-विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची औकात नाही ती फक्त…
“फडणवीस व त्यांचे सर्वच बापजादे महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न पाहत होते, ‘महाराष्ट्र दिनी’ दंडास काळ्या फिती बांधून १०५ हुतात्म्यांचा अपमान करीत होते तेव्हा ‘ठाकरे’ अखंड महाराष्ट्रासाठी वाघाचे पंजे मारीत होते. आज मुंबई-विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची औकात नाही ती फक्त ठाकरे व शिवसेनेमुळेच. फडणवीस यांची गाडी उताराला लागली आहे व भांडे घरंगळत आहे. ते वैफल्यग्रस्त असल्याने बेभान झाले आहेत. हे असेच राहिले तर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे अस्तित्व संपून जाईल. लोकशाहीसाठी हे चित्र चांगले नाही,” असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आलाय.