ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी हिंगोली येथील ‘निर्धार सभे’तून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. जपान दौरा, राज्यातील दुष्काळाची परिस्थिती आणि महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाण्यावरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर तिरकस टोलेबाजी केली. राज्यात दुष्काळ पडला असताना देवेंद्र फडणवीस जपानला गेले. टरबुजाच्या झाडालाही पाण्याची आवश्यकता असते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टोलेबाजी केली.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. सर्वस्व गेलेल्या आणि निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न नेत्याचे हे उद्गार आहेत. एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाची तुम्हाला मदत घ्यावी लागेल, असं वाटतं, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीटद्वारे केली.

हेही वाचा >> “गद्दाराला नाग समजून पूजा केली, पण…”, उद्धव ठाकरेंचा संतोष बांगरांवर हल्लाबोल

केशव उपाध्ये ट्वीटमध्ये म्हणाले, “सर्वस्व गेलेल्या आणि निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न नेत्याचे हे उद्गार आहेत. उद्धवजी, आपले सर्वस्व संपले आहे, हे आपणच मान्य करून टाकलं, हे एक बरं झालं. तुम्हाला मतदार विचारत नाहीत. साथीदार साथ देत नाहीत, अशा अवस्थेत तुमचा तोल ढळला आहे. एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाची तुम्हाला मदत घ्यावी लागेल, असं वाटतंय. बघा तुमच्याकडे कोणी मिळतो का?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांवर तिरकस टोलेबाजी करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी कोणाला काही वाईट बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांवर तर मी बोलायचंच सोडून दिलंय. मी काहीही म्हटलं तरी त्याचा बोभाटा होतो’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मी आधी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार. एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार. आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार. कारण मी काही बोलायचं ठरवलं तरी त्याचा बोभाटा होतो. पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले. टरबुजाच्या झाडालासुद्धा पाणी लागतं, असं मी म्हणत नाही, अजिबात म्हटलेलं नाही.”