भाजपच्या पाशा पटेल यांचा घरचा अहेर
अचानक तुरडाळीचे भाव वाढल्यानंतर राज्य सरकारने कडधान्याबरोबरच तेलबियांच्या साठवणुकीवरही र्निबध घालण्याची अधिसूचना जारी केली आहे. हे र्निबध बेजबाबदारपणाचे व मूर्खपणाचे आहे, अशी टीका भाजपाचे माजी आमदार आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी येथे केला. फडणवीस सरकारला हा घरचा अहेर समजला जात आहे.
येथील विश्रामभवनात सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारने केलेली ही चूक तातडीने दुरुस्त करावी, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्रही सादर केल्याचे सांगितले. जिल्ह्य़ात सुरू असलेल्या नगर पंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ते प्रचारासाठी आले होते.
सरकारकडून कडधान्य आणि तेलबिया साठवणुकीसंदर्भात अलीकडेच जारी केलेल्या अधिसूचनेमुळे सोयाबीनचे दर प्रती िक्वटल ४०० रुपयाने घसरले आहेत. राज्यात सोयाबीनचे उत्पादन आधीच कमी होत आहे. त्यात सरकारने घातलेल्या या र्निबधामुळे त्याचा जबरदस्त फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
ही बाब अतिशय चुकीची असून ती फडणवीस सरकारने तातडीने दुरुस्त केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखविली, पण ही अधिसूचना जारी करून तीन दिवस झाले तरी सरकारने आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले असल्याचे पटेल यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सलग सुटय़ांमुळे ही दुरुस्ती सरकारला करता आली नसावी, अशी टोलवाटोलवी केली.
‘सोयाबीनचा साठा करा’
पाशा पटेल यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पुढील ५-६ महिने आपले सोयाबीन बाजारात आणून विकू नये, असा अजब सल्लाही दिला. दर ५-६ हजारावर जाण्याची शक्यता आहे, असे बोलून त्यांनी शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली तर त्यांना पुढे चांगला दर मिळेल, असे स्पष्ट केले. शेतकरी नेते म्हणून आपण सरकारच्या एकूणच कारभारावर समाधानी आहात का?, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सरकारला जेमतेम एक वर्ष झाले. आणखी वेळ द्यावा लागेल, असे स्पष्ट केले.