भारतातील २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक तीनपैकी एका व्यक्तीला रक्तदाबाचा त्रास आहे. रक्तदाबाने प्रभावी पाचपैकी एकच व्यक्ती वेळेवर उपचार घेतो. या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने हृदयविकार, पक्षाघात, किडनी निकामी होणे असे आजार होऊन मृत्यू ओढवू शकतो. याविषयी फारसे प्रबोधन नसल्याने रक्तदाब ‘सायलंट किलर’ ठरत आहे. मात्र, योग्य औषधोपचार, व्यायाम व आहार घेतल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येईल, असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप शिरसाठ यांनी केले.
सिप्ला कंपनी व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोगदिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी डॉ. के. बी. संकलेचा, डॉ. योगेश गाडेकर उपस्थित होते. डॉ. शिरसाठ म्हणाले, अनेकदा रक्तदाब असलेल्या रुग्णाची काहीच लक्षणे दिसत नाहीत. काहींना मात्र डोके दुखणे, चक्कर येणे, दम लागणे असा प्रकार जाणवतो. रक्तदाब होण्याची अनेक कारणे आहेत. आईवडिलांना रक्तदाबाचा त्रास असेल तर मुलालाही अनुवंशिकतेने येऊ शकतो. जास्त वजन, फास्ट फूड, गरजेपेक्षा जास्त मीठ खाणे, अति मद्यपान यामुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. रक्तदाब झाला म्हणून रुग्णाने घाबरण्याचे कारण नाही. सर्वात महत्त्वाचे यावर उपलब्ध असलेल्या औषधांमुळे कुठलाही दुष्परिणाम होत नाही. योग्य औषधोपचाराद्वारे रुग्ण सुसह्य जीवन जग शकतो. रक्तदाब होऊ नये म्हणून नियमित व्यायाम आवश्यक आहे. आठवडय़ातून कमीतकमी १५० मिनिटे घाम निघेपर्यंत चालले पाहिजे, आहारात फळांचा वापर वाढवावा, ताणतणाव कमी करावा. डॉ. संकलेचा म्हणाले, गरजेपेक्षा जास्त घेतलेले मीठ ५०० ते ६०० मिली पाणी शरीरात साठवून ठेवते. ब्रेड, वेफर्स, लोणचे, पापड, पॅकेज फूड यातूनही गरजेपेक्षा जास्त मीठ शरीरात जाऊ शकते. एका दिवसात शरीराला अवघा चहाचा एक सपाट चमचा एवढीच मिठाची गरज असते. रक्तदाबाचा त्रास टाळण्यासाठी शक्यतो अळणी खाण्याला प्राधान्य द्यावे. या वेळी सिप्लाचे प्रशांत पवार, योगिराज ठोंबरे, विवेकानंद तोडमल उपस्थित होते.