बहिणीशी असभ्य व गैरवर्तन केल्यामुळे संतापलेल्या भावाने वडिलांची विषाचे इंजेक्शन देऊन आणि गळा आवळून हत्या केल्याची घटना पंचवटीतील दुर्गानगर भागात उघडकीस आली. हत्या करून संबंधित युवकाने पोलीस ठाण्यात दाखल होत या घटनेची कबुली दिली. शुक्रवारी न्यायालयाने आरोपीला २१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे कृषी अधिकारी हनुमंत तोताराम मोरे (५५) यांचा मुलगा मयूर (२०) याने खून केला. वडिलांनी बहिणीशी असभ्य वर्तन केल्याचा राग मनात ठेवून यापूर्वीही त्याने वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला होता.
त्याची आई गावाला गेली असल्याने घरात मयूर, बहिण व वडील असे तिघेजण होते. मध्यरात्रीच्या सुमारास मयूरने बहिणीच्या खोलीला बाहेरून कडी लावून तो वडिलांच्या खोलीत गेला. वडिलांना प्रथम विषारी इंजेक्शन दिले. त्याचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे पाहून त्याने ओढणीने वडिलांचा गळा आवळला. तसेच त्यांचे डोकेही भिंतीवर आपटले. त्यातच हनुमंत मोरे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आणि उपरोक्त घटनेची माहिती दिली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मयूरला अटक करण्यात आली.