संगमनेर तालुक्यातील सुसंस्कृत राजकारण मोडून काढण्याचा काही शक्तींचा प्रयत्न आहे. शाईफेक करण्याच्या प्रकाराला फार महत्त्व देण्याची गरज नाही, परंतु असे कृत्य करायला सबंधिताला प्रवृत्त करणाऱ्याचे हात आणि मेंदू महत्त्वाचा असून त्याला ठेचून काढावे लागेल असे घणाघाती प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.मंत्री थोरात यांच्यावर राजापूर गावात शिवसेनाप्रणित युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने शनिवारी शाई फेकली होती. त्याचे तीव्र पडसाद शहर व तालुकाभर उमटत आहेत. घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामीण भागातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. शहरात सर्वपक्षीय निषेध मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी थोरात बोलत होते. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, हिरालाल पगडाल, अविनाश सोनवणे, मनीष मालपाणी यांच्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
 थोरात म्हणाले की, तालुक्याला विचारांची थोर परंपरा आहे. कॉ. दत्ता देशमुख यांनी राज्याला विचारांचे नेतृत्व दिले. उत्तम प्रशासक म्हणून खताळ पाटील यांनी संगमनेरचा ठसा राज्यात उमटवला. त्यानंतर भाऊसाहेब थोरांतांनी सहकारातून विकासाच्या संकल्पनेमुळे आज संगमनेर राज्यात एक नंबरवर आहे. अनेक निवडणूकांत विचाराच्या लढाया जरूर झाल्या, मात्र निकालानंतर एकमेकांच्या घरी जेवायला जाणाऱ्या अशा नेत्यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आपण पुढे नेत आहोत. जर सहकारात राज्यात आमच्या पुढे कोणी असेल तर तसे दाखवून देण्याचे आव्हान देतानाच आम्ही उभे केलेले संसार मोडायला कोणी निघाले असेल तर यापुढे ते सहन करणार नाही. विशेषत: गेल्या पाच वर्षांत आपल्यावर अनेक संकटे आली. कुटुंबासाठी म्हणून कधी वेळ देता आला नाही. असे असताना रोज नवनव्या अफवा पसरवल्या जातात. कुटुंब, मुलाबाळांबाबत अफवा पसरविणाऱ्यांची लायकी काय आहे, हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. हे सगळे घडवून आणणारी कोणती प्रवृत्ती आहे हेही आपल्याला माहीत आहे. त्यांचा बंदोबस्त आता करावाच लागेल. आजवरच्या राजकीय जीवनात न मागता आपल्याला भरपूर मिळाले, आपण समाधानी आहोत. आता जे करायचे ते जनतेसाठी करायचे, असे थोरात म्हणाले.आ. डॉ. तांबे म्हणाले, मतभेदाच्या राजकारणाला कधीही थारा न देणाऱ्या आपल्या नेत्याचा अपमान हा संपूर्ण तालुक्याचा अपमान आहे. लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी संस्कृतीचा त्यांनी धिक्कार केला. येत्या पंधरा दिवसांत घटनेमागील सूत्रधारांची माहिती पोलिसांनी जनतेसमोर आणली नाही तर आमच्या पद्धतीने माहिती बाहेर काढू असा इशारा युवक कॉग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिला. कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, मनीष मालपाणी, उपसभापती बाळासाहेब गायकवाड, अशोक खेमनर, उत्कर्षां रूपवते, दिलीप पुंड आदींनी आपल्या भाषणांतून घटनेचा तीव्र निषेध केला. दरम्यान सकाळी अमृत उद्योग समूहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर निषेध सभा घेण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brain damage to ink war person balasaheb thorat
First published on: 25-08-2014 at 02:40 IST