मालेगावमधील करोनाच्या रूग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्यामुळे नाशिककरांच्या टेन्शमध्ये वाढ झाली आहे. रविवारी सकाळी मालेगावमध्ये पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्यात भर म्हणून दुपारी १२ वाजता आणखी १३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मालेगावात दिवसभरात १८ नवे करोचे रूग्ण आढळले आहेत. आजच्या १८ नव्या रूग्णांमुळे मालेगाताली करोना बाधितांची संख्या २७ झाली आहे. त्यापैकी मालेगाममधील एका करोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.

मालेगावमुळे नाशिक जिल्ह्याच्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नाशिकमध्ये करोनाबाधितांची एकूण संख्या ३२ झाली आहे. नाशिक शहरात तीन, निफाड आणि चंदवडमध्ये प्रत्येकी एक-एक रूग्ण आढळला आहे. निफाडमधील एक रूग्ण पुर्णपणे बरा झाल्यामुळे त्याला होम क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आलं आहे. मालेगाव मधून सातत्याने करोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहे मागील तीन दिवसांमध्ये मालेगाव मधून २७ नवे रुग्ण समोर आल्याचे धक्कादायक चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण मालेगावमध्ये आहेत. रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे चार दिवस पूर्णतः लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मालेगावच्या नयापुरा भागातील २२ वर्षांच्या महिलेचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी या महिलेला धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उत्तर महाराष्ट्रात मालेगाव हे करोनाचे केंद्रबिंदू ठरल्याचे चित्र आहे. या परिसरात अतिशय दाटीवाटीने नागरी वस्ती आहे. या भागात आतापर्यंत २७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. अहवाल सकारात्मक आलेल्यांमध्ये चांदवड येथील एकाचा समावेश आहे. नाशिक शहरात नव्याने दोन रुग्ण आढळून आल्याने नाशिककरांमध्येही अस्वस्थता आहे. ब्राझीलहून परतलेल्या आणि मुंब्रा येथे नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. संबंधितांचे अहवाल सकारात्मक आल्यामुळे रुग्णांची संख्या तीनवर पोहचली.

मालेगावमध्ये अधिक धोका

मालेगाव हे यंत्रमागाचे शहर असल्याने येथील अनेकांची फुफ्फुसाची क्षमता तुलनेने कमी आहे. तसेच क्षय रुग्णांची संख्या अधिक आहे. या कारणास्तव मालेगावात करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असल्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला. अशा परिस्थितीत नागरिकांनी सामाजिक अंतरासह सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नियमभंग करू नये. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील १५ दिवस अतिशय महत्वाचे आहेत. प्राप्त परिस्थितीत सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.