रायगड जिल्ह्य़ातील बीएसएनएल ब्रॉडबॅण्ड व मोबाइल सेवा पुरती कोलमडली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान केबल तुटल्याने अलिबाग, मुरुड, म्हसळा सर्कलमधील ब्रॉडबॅण्ड आणि मोबाइल सेवा पूर्णपणे बंद पडली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील बहुतांशी सर्वच बँकांचे बँकिंग व्यवहार ठप्प झाले आहेत.
 मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान पेण तालुक्यातील वडखळजवळ बीएसएनएलची केबल तुटल्याने अलिबाग सर्कलमधील बीएसएनएल यंत्रणा ठप्प झाली आहे. यात बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड सेवा, एसटीडी सेवा आणि मोबाइल सेवेचाही समावेश आहे. अलिबाग सर्कलमधील मुरुड आणि म्हसळ्याच्या बीएसएनएल सेवाही यामुळे बाधित झाली आहे.
बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाल्यामुळे जिल्ह्य़ातील बहुतांशी सर्वच बँकांचे व्यवहार अडचणीत आले आहे. नेटवर्क नसल्यामुळे कोरबँकिंग आणि एटीएम सेवा बाधित झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आणि ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले आहे, तर सरकारी कार्यालयांमधील ब्रॉडबॅण्ड सेवा बंद असल्याने या कार्यालयातील कामेही विस्कळीत झाली होती.
दरम्यान केबल दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून लवकरात लवकर ही सेवा सुरळीत होईल असा विश्वास बीएसएनएल अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.