जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील दोन मजली इमारत गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेच जवळपास ११ जण जखमी झाल्याची माहिती आहे. दैव बलवत्तर म्हणून यावेळी सात जण थोडक्यात बचावले. दरम्यान, यामुळे जीर्ण इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जळगावकर सकाळी गुलाबी थंडीमध्ये साखरझोपेत असताना शनिपेठ परिसरात दुमजली इमारत कोसळ्याची दुदैवी घटना घडली. महापालिकेची सतरा क्रमांकाची शाळा शनिपेठ परिसरात आहे. शाळेसमोरील दोन मजली जुनी इमारत गुरुवारी पहाटे चार-साडेचारच्या सुमारास कोसळली. त्यामुळे नागरिकांची प्रचंड धावपळ सुरु झाली. यावेळी ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना इतरांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी शशिकांत बारी हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

इमारत कोसळत असल्याची जाणीव होताच वरच्या मजल्यावरील काही रहिवासी बाहेर यायचा प्रयत्न करू लागले. वरच्या मजल्यावर झोपलेले पाटील कुटुंबीय इमारत कोसळणार असल्याची जाणीव होताच घराबाहेर पडले. मात्र, खालच्या मजल्यावर असलेले रमेश पाटील यांच्या आई व मुलगा हे इमारत कोसळण्यापूर्वी बाहेर पडू शकले नाही. ते इमारत कोसळल्यानंतर आतमध्ये ढिगाऱ्यात अडकले. या घटनेनंतर शनिपेठ भागातील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेली वृद्धा व तरुणाला शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले.