कर्जबाजारी झालेल्या शेतक-याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना राहाता तालुक्यातील दहेगाव-को-हाळे या गावात रविवारी घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की दहेगाव येथील रमेश भिकाजी चौधरी (वय ५०) या शेतक-याने देवयानी पतसंस्था कोपरगाव, डॉ. के. वाय. गाडेकर पतसंस्था राहाता व युनियन बँक राहाता यांच्याकडून कर्ज घेतले होते. रविवारी रात्री त्यांनी घरीच विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याजवळ विषारी औषधाची बाटली व पतसंस्थेची तसेच बँकेची कागदपत्रे व लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आल्याने कर्जाचे ओझे असहय़ झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले.
देवयानी पतसंस्थेतून (कोपरगाव) चौधरी यांनी १० ते १५ वर्षांपूर्वी पाच लाख रुपये कर्ज घेतले होते. ते वेळेत न भरल्यामुळे घेतलेले कर्ज १५ लाख रुपये झाले. कर्ज घेतेवेळी चौधरी यांनी डांगे नावाच्या व्यक्तीची बोगस जागा दाखविली होती. हा प्रकार पतसंस्था व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर पतसंस्थेने चौधरी यांच्या विरुद्ध खोटी कागदपत्रे देऊन पतसंस्थेची फसवणूक केल्याचा गुन्हाही दाखल केला होता. कोपरगाव दूध संघाकडून चौधरी यांना दुधातील फरक व आंबूस दुधाचे पैसे फरकासह घेणे होते. संघाने कबूल करूनही ही रक्कम वेळेत न मिळाल्याने चौधरी बँकेचे तसेच पतसंस्थेचे कर्ज वेळेत भरू न शकल्याने घेतलेले कर्ज वाढत गेले. त्यामुळे जगणे असह्य झाल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे चौधरी यांनी म्हटले असून, या प्रकरणी माझ्या घरच्यांना दोषी धरू नये असा उल्लेखही चिठ्ठीत केला आहे.