गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक एका पावसात भुईसपाट झाल्यानं शेतकरी हवालदील झाला आहे. गारपीटीमुळे प्रचंड नुकसान झालेलं असताना दुसरीकडे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक मंत्री अयोध्या दौऱ्यावर गेल्यामुळे विरोधकांकडून परखड टीका केली जात आहे. शेतकरी अवकाळी आणि गारपीटीमुळे हवालदील झालेला असताना सत्ताधारी अयोध्या दौऱ्यावर कसे जाऊ शकतात? असा प्रश्न राज्यातील विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात आहे. या मुद्द्यावरून मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी विरोधकांवर टीकास्र सोडलं आहे.
“सतत पडणाऱ्या पावसासाठी कधीही केंद्र किंवा महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत मदत दिली नव्हती. आम्ही पहिल्यांदा अशा पावसामुळे होणाऱ्या नुकसानीवर भरपाई देण्याचा निर्णय घेतला. त्याला थोडा वेळ लागतोय. खऱ्या अर्थाने पीडित शेतकऱ्यापर्यंत ती मदत १०० टक्के पोहोचेल”, असं केसरकर म्हणाले.
“उगीच नाटक करण्यात अर्थ नाही”
दरम्यान, शेतकऱ्यांच्या भेटीगाठींवरूनही केसरकरांनी टीका केली. “उगीच नाटक करण्यात काही अर्थ नसतो. आम्ही तिकडे गेलो, शेतकऱ्यांना भेटलो वगैरे. मुळात तुम्हाला काही अधिकारच नाहीये. तुम्ही सत्तेवर असताना कधी गेले नाहीत. तुम्ही तेव्हा ‘पॅलेस पॉलिटिक्स’ करत राहिलात. आम्ही तसे नाही आहोत. आम्ही जरी अयोध्येला गेलो असलो, तरी कृषीमंत्री इथेच होते. कृषीमंत्री हे सगळं हाताळत असतात. ते इथे होते हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलंच गेलं नाही”, असं केसरकर म्हणाले.
“अयोध्या दौरा रविवारी होता”
दरम्यान, रविवारच्या दिवशी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री अयोध्या दौऱ्यावर गेल्याचा मुद्दा केसरकरांनी उपस्थित केला. “कृषीमंत्री इथेच होते आणि ते सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सगळे जिल्हाधिकारीही इथेच आहेत. २४ तास फक्त महाराष्ट्राच्या भूमीतून बाहेर असलं म्हणजे काही वेगळं झालं असं नाही. आणि त्यातही तो रविवार होता. थोडासा विचार करा. आम्ही १०० टक्के शेतकऱ्यांच्या हितासाठी समर्पित आहोत”, असं केसरकर म्हणाले.
“नेहमी संबंध बिघडवण्याचे प्रयत्न होतात”
केसरकरांनी यावेळी ठाकरे गटावर महाराष्ट्र-उत्तर प्रदेशदरम्यान संबंध बिघडवण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप केला. “ही सगळ्यात मोठी दोन राज्यं आहेत. नेहमी संबंध बिघडवत राहायचे, काहीतरी वाईट बोलत राहायचं. हे आज झालेलं नाही. सत्तेत असतानाही तेच केलं गेलं. विनाकारण शत्रुत्व घेतलं गेलं. रोज सामनामध्ये काहीतरी लिहिलं जातं. बाळासाहेबांच्या काळापासून सामनाकडे मुखपत्र म्हणून बघितलं जातं. सामना त्याच भूमिकेत राहायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. महाराष्ट्राची परंपरा ही सौजन्यशीलतेची आहे. वारकरी संप्रदायाचा, चांगलं वागण्याचा वारसा जपला गेला पाहिजे”, असं केसरकर यावेळी म्हणाले.