सरकारी कामासाठी खेटे घालण्याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांनी घेतला आहे. त्यामुळे आपली कामं प्रलंबित ठेवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांबाबत तक्रार असणं ओघानं आलंच. अशीच एक तक्रार घेऊन बुलढाण्यातील एक व्यक्ती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे गेली असता त्यांनी “हे माझं राज्य आहे, तुमचं राज्य नाही”, असं म्हणत त्या व्यक्तीला शांत केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजेंद्र शिंगणे हे शांतस्वभावी व्यक्ती असताना त्यांनी अशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला शांत करण्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.

नेमकं झालं काय?

राजेंद्र शिंगणे हे रविवारी बुलढाण्यात त्यांच्या मतदारसंघातील देऊळगाव राजा भागात बैठकीसाठी हजर होते. या बैठकीला मतदारसंघातील अधिकारी आणि कर्मचारी हजर होते. बैठकीनंतर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मतदारसंघातल्या नागरिकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्या तक्रारी मांडायला सुरुवात केली. त्यामध्ये स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रलंबित ठेवलेल्या कामांच्याही काही मागण्या होत्या.

व्हिडीओमध्ये काय आहे?

यादरम्यान, एक ज्येष्ठ नागरिक त्यांची तक्रार घेऊ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे आले. तहसिलदारांनी काही कागदपत्रांच्या बाबतीत अर्ज मान्य न केल्याची तक्रार या नागरिकाने शिंगणेंकडे केली. शिंगणे याबाबत अधिकाऱ्याकडून समजून घेत असताना देखील हे ज्येष्ठ नागरिक काय घडलं, ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी राजेंद्र शिंगणेंनी “तुम्ही शांत रहा, हे तुमचं राज्य नाही, हे राज्य माझं आहे, इथे सर्व कामे शांततेत झाली पाहिजेत”, अशा शब्दांत दरडावत त्या व्यक्तीला शांत केलं. तसेच, संबंधित व्यक्तीच्या तक्रारीवर अधिकाऱ्याला काही निर्देश देखील दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.