आंदोलनानंतरही परीक्षेला बसण्याची मागणी फेटाळली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंगोली : येथे महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेत रविवारी परीक्षा केंद्रावर उशिराने पोहोचणाऱ्या सुमारे शंभर उमेदवारांना पात्रता परीक्षा देण्यापूर्वी अपात्र व्हावे लागले आहे. यावेळी उमेदवारांनी रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबून पाहिला. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परीक्षेला बसू देण्याची त्यांची मागणी प्रशासनाने फेटाळून लावली.

येथील महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे रविवारी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सात परीक्षा केंद्रांवर २ हजार १६७ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये सरजूदेवी कन्या विद्यालय, माणिक स्मारक विद्यालय, आदर्श महाविद्यालय ‘अ’ व ‘ब’ असे चार परीक्षा केंद्र निवडण्यात आले होते.

उमेदवारांनी या परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी २० मिनिटे अगोदर उपस्थित राहणे आवश्यक होते.

दरम्यान, परीक्षा परिषदेच्या सूचनेनुसार येथील माणिक स्मारक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर १० वाजता मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. त्यामुळे शंभरपेक्षा अधिक उमेदवारांना परीक्षा केंद्रात जाता आले नाही. या प्रकारामुळे उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रास्ता रोको सुरू केला.

काही वेळातच आमदार डॉ. संतोष टारफे तिथे आले. विद्यार्थ्यांसोबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्या ठिकाणावरून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून याबाबत माहिती दिली. मात्र वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसारच परीक्षा घेतल्या जात असल्याचे सांगितल्यानंतर आमदार डॉ. टारफेंना माघार घ्यावी लागली. उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त करून जिल्हाधिकारी कार्यालय सोडले. केवळ दहा मिनिटे उशिरा पोहोचल्यामुळे सुमारे शंभर उमेदवारांना पात्रता परीक्षेपासूनच वंचित राहावे लागले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidate not allowed to participate in teacher eligibility test for coming late
First published on: 16-07-2018 at 03:32 IST