पिंपरी-चिंचवड हद्दीतील डूडूळगाव येथे इमारतीचे काम करणाऱ्या तीन कामगारांचा लोखंडी क्रेन मधून पडल्याने मृत्यू झाला होता. या घटनेला सहा दिवस पूर्ण झाले असून दिघी पोलिसांनी उशिरा का होईना संबंधित बांधकाम व्यवसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पांडुरंग बसप्पा चव्हाण वय-३५,भगवान गायकवाड वय-२९,अमर राठोड वय-२८ अशी अपघातात मयत झालेल्या कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी आता राधे रिगल रेसिडेन्सीच्या  बांधकाम व्यवसायिकवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गिरी यांनी फिर्याद नोंदवली आहे.

भावेश पटेल,चेतन मोहनभाई पटेल वय-३५ दोघे ही रा.मोशी,इरफान अली खान वय-३४ रा.काळेवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यवसायिकांचे नावे आहेत. अद्याप त्यांना अटक झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास डूडूळगाव येथील राधे रिगल रेसिडेन्सी येथे ६ मजली इमारतीचे काम सुरू होते. लोखंडी क्रेनमधून तीन कामगार सहाव्या मजल्यावर जात असताना अचानक लोखंडी क्रेन खाली कोसळली. यात तीन कामगार जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. परंतु दिघी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला नाही. घटनेच्या सहाव्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी अद्याप बांधकाम व्यवसायिकांना अटक करण्यात आली नाही. अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.