लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : सांगली शहरात प्रवेश करताना सांगलीवाडी तपासणी नाक्यावर गस्ती पथकाने बुधवारी साडेदहा लाखाची रोकड एका वाहनातून जप्त केली. वाहन चालक ज्योतिबा गोरे यांच्याकडे या रकमेबाबत कोणतीही कायदेशिर माहिती नसल्याने प्राप्तीकर विभागाला याची माहिती देण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य व आंतरजिल्हा तपासणी नाके स्थापन करण्यात आले आहेत. या नाक्यावर २४ तास पोलिस व प्रशासन यांचे पथक कार्यरत असते.

आणखी वाचा-सांगली, तासगावात पावसाने दिलासा

सांगलीवाडी येथे तपासणी पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू असताना मोटार (एमएच ०९डीएम १८९९) अडवून वाहनाची झडती घेतली असता, चालक जोतिबा फुलचंद गोरे यांच्या ताब्यात १० लाख ५१ हजार २० रुपये इतकी रोकड मिळून आली. या रकमेबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता रकमेबाबत कोणतीही कागदपत्र मिळाली नाहीत. रक्कम हस्तांतराबाबत निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी दाखवू शकला नाही.

चालक गोरे हा पुणे येथून आरग (ता. मिरज) येथे जात होता अशी माहिती मिळाली. निवडणूक आयोगाच्या व आयकर विभागाला या कारवाईचा अहवाल पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे निरीक्षक मोरे यांनी सांगितले.