अमरावतीत ‘जातपडताळणी’चा वाद पेटला!

जात प्रमाणपत्राच्या लढाईत नवनीत राणा यांनी तूर्तास बाजी मारली

बडनेराचे आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत कौर-राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध तर त्यांचे वडिलांचे अवैध ठरवण्याच्या जातपडताळणी समितीच्या निर्णयावरून अमरावतीत चांगलाच राजकीय धुराळा उडाला आहे. जात प्रमाणपत्राच्या लढाईत नवनीत राणा यांनी तूर्तास बाजी मारली खरी, पण याच मुद्दय़ावर खासदार आनंदराव अडसूळ आणि रवि राणा यांच्या समर्थकांमध्ये होळीपूर्वीच रंगलेल्या शिमग्याचा आनंद अमरावतीकर घेत आहेत.

नवनीत कौर-राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय मुंबई उपनगर जिल्हा जातपडताळणी समितीने दिला, पण त्यांचे वडील हरभजनसिंग कुंडलेस यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून ते जप्त करण्याचा निर्णयदेखील याच समितीने घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चेला निमित्त मिळाले आहे. नवनीत कौर यांचा मोची या अनुसूचित जातीचा दावा मान्य करण्यात आल्याने त्यांचा लोकसभा निवडणूक लढण्याचा मार्ग सध्या तरी मोकळा झाला आहे.

नवनीत कौर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात बनावट कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र मिळवून निवडणूक लढवली होती, अशी तक्रार जयंत वंजारी आणि राजू मानकर यांनी जातपडताळणी समितीकडे केली होती. त्यानंतर खासदार आनंदराव अडसूळ यांनीही अशाच प्रकारची तक्रार दिली. या तक्रारींवर संयुक्तपणे तीन सदस्यीय समितीने सुनावणी घेतली. समितीने नवनीत कौर यांचे वडील हरभजनसिंग कुंडलेस यांना मुंबई उपनगर जिल्ह्य़ाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले मोची या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचा निर्णय घेतला. हे दोन्ही निर्णय परस्परविरोधी असल्याने त्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी वैधतेसाठी दिलेल्या बनावट कागदपत्रांचाच उपयोग करून नवनीत राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्र वैध करण्यात आले, ही बाब समितीच्या कार्यपद्धतीवर संशय घेणारी आहे, असेही तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.

जात प्रकरणाची ही लढाई संपण्याची चिन्हे अद्याप तरी दिसत नाहीत, पण यातून आमदार रवि राणा आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक टोकदार बनला आहे.

रवि राणा यांचा युवा स्वाभिमान हा राजकीय पक्ष आहे. स्वत: ते निवडणुकीत आपल्या पक्षाचा झेंडा वापरतात. गेल्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी नवनीत कौर यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला होता.

निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावरील वावर हळूहळू कमी होत गेला आणि आता तर त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध संपल्यागत दिसत आहे. आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्याचे वक्तव्य नवनीत राणा यांनी केल्यानंतर अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावर खुलासा करण्याच्या भानगडीत भाजपचे नेते पडले नाहीत, पण अजूनही राणा समर्थकांना भाजप प्रवेशाची आस आहे.

रवि राणा हे सरकारचे समर्थक अपक्ष आमदार म्हणून उघडपणे वावरतात. मुख्यमंत्र्यांशी जवळीक असल्याचे दाखवतात. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्याही भेटीला जातात. एकीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांशी पंगा घेतात आणि त्याच वेळी शिवसेनेसोबतही त्यांचे युद्ध सुरू असते. अमरावतीकरांसाठी हे सर्व अचंबित करणारे असले, तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र रवि राणा यांचे व्यक्तिमत्त्व ‘बोले तैसा चाले’ असे असल्याचे मोठमोठाल्या होर्डिगमधून दर्शवीत असतात. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या लेखी त्यांचे राजकारण हे बेभरवशाचे आणि घातक आहे. पण नवनीत राणा यांच्या पक्षप्रवेशाबाबत वरूनच निर्णय झाल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांचा नाइलाज होणार आहे.

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरल्यानंतर आनंदराव अडसूळ यांच्या समर्थकांमध्ये मात्र अस्वस्थता वाढली आहे. हे सर्व जुळवून करण्यात आल्याचा त्यांचा आक्षेप आहे. अडसूळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न केला. नवनीत यांच्या वडिलांच्या मूळ गावी जाऊन बराच वेळ खर्ची घातला. पण हाती काही लागले नाही, असे राणा यांचे म्हणणे आहे. राणा आणि अडसूळ समर्थकांमध्ये आता शब्दयुद्ध पेटले आहे. समाज माध्यमांवर ते अधिक प्रकर्षांने जाणवू लागले आहे.

जातपडताळणी समितीचा निर्णय आश्चर्यकारक आहे. यावर न्यायालयात दाद मागितली जाईल. पण या निर्णयानंतर रवि राणा यांनी आपल्यावर आरोप सुरू केले, ते हास्यास्पद आहेत. त्यांची ती जुनी सवय आहे. प्रत्यक्ष काम करणे आणि गवगवा करणे यातला फरक लोकांना कळतो. हे नाटक फार काळ टिकणारे नसते. आपण केलेल्या कामांचा लेखा-जोखा लोकांसमोर आहे. तेच योग्य न्यायनिवाडा करतील.   – आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती

जात प्रमाणपत्राचे हे प्रकरण उकरून काढून आपले खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. खासदार आनंदराव अडसूळ यांनी यात बराच वेळ खर्ची घातला. तेवढा वेळ जर त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी दिला असता, तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. जिल्ह्य़ाचा विकास करण्याऐवजी ते आपल्यासोबत भांडत बसले. आपल्याला भयंकर असा त्रास दिला, अखेर न्याय मिळाला. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढायची हे अद्याप ठरलेले नाही, आपली उमेदवारी ही जनसामान्यांची राहणार आहे.    – नवनीत राणा

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Caste verification issue in amravati

ताज्या बातम्या