ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारण्यास ‘सेबी’ने मनाई केल्यानंतरही अनेकांकडून ठेवी घेणारा ‘समृद्ध जीवन’चा सर्वेसर्वा महेश मोतेवार याच्या भोवतीचा फास मंगळवारी आणखी आवळला गेला. केंद्रीय अन्वेषण विभागाने ‘समृद्ध जीवन’शी संबंधित विविध कंपन्यांच्या कार्यालयावर मंगळवारी छापे टाकले. महाराष्ट्रासह ओडिशामध्ये छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळाली. ‘समृद्ध जीवन’च्या पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूरमधील ५८ कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. सीबीआयचे अधिकारी कार्यालयांमध्ये विविध कागदपत्रांची छाननी करीत आहेत. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील फसवणुकीच्या एका गुन्ह्य़ात महेश मोतेवार याला उमरगामधील न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. न्या. एच. आर. पाटील यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी न्यायालयाकडे सात दिवसांची कोठडी मागितली होती.
‘समृद्ध जीवन’चा संचालक महेश मोतेवार याने गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांकडून पैसे गोळा केले. ‘सेबी’ने त्याच्या कंपनीवर निर्बंध घातल्यानंतरही त्याने ठेवी स्वीकारल्या होत्या. मोतेवार याच्यासह वैशाली मोतेवार, घनश्याम पटेल, राजेंद्र भंडारे यांच्याविरुद्ध पुण्यातील डेक्कन आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. ‘सेबी’चे सहाय्यक महाव्यवस्थापक सचिन सोनावणे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. या प्रकरणी सीबीआयकडून छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
फसवणुकीच्या एका गुन्ह्य़ात महेश मोतेवार याला उस्मानाबाद पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला मंगळवारी दुपारी उमरगा येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने मोतेवारला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे आमीष दाखवून ३५ लाख रूपयांना फसवल्याप्रकरणी २०१२ मध्ये उमरगा येथील न्यायालयाच्या आदेशाने मोतेवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ४४८, ४२७, ४९१, ३४ कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. २०१२ मधील या गुन्ह्यात मोतेवार यांना उस्मानाबाद पोलिसांनी फरार घोषित केले होते.