सरकार शिक्षणावर अधिकाधिक खर्च करेलच. शिक्षणावर खर्च करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. पण माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योगदान करावे, असा माझ्या विधानाचा आशय होता, असा खुलासा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या वादग्रस्त विधानाबाबत केला आहे. सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येण्यापेक्षा शाळांनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे, असे मत त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले होते. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

सरकार शिक्षणावर खर्च करणार नाही. केवळ माजी विद्यार्थ्यांनी यावर खर्च करावा, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. गेल्या ४ वर्षात मोदी सरकारने ७० टक्के शिक्षणावरील तरतूद वाढवली आहे. सरकार शिक्षणावरील तरतूद अधिकाधिक वाढवतच राहील. शिक्षणावर खर्च करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. पण त्यात आणखी भर यायला हवी. ज्ञानप्रबोधिनी शाळेचे माजी विद्यार्थी त्यांची शाळा चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करतात, हे चांगले आहे. याचे उदाहरण देऊन ते विधान मी केले होते, असेही त्यांनी नमूद केले.

काही शाळा सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येतात आणि आर्थिक मदत मागतात. ते खरंतर माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागू शकतात. आपल्या शाळेला वा महाविद्यालयाला मदत करणे हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्यच आहे. अनेक विद्यार्थी उपकृत राहून त्यांच्या शाळांना सढळ हस्ते मदत करतात. जनप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी अजून शाळेच्या संपर्कात आहेत. शाळेची चांगली निगा राखावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यातून इतरांनी आदर्श घ्यावा, असेही ते कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते.