scorecardresearch

“आता माझं महाविकास आघाडीला खुलं आव्हान आहे, त्यांनी…”, विधानपरिषद निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

कायद्यात बदल करून रडीचा डाव खेळू नका, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीला आव्हान दिलं आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

निवडणुका बिनविरोध करू असा शब्द काँग्रेसने न पाळल्यामुळे झालेल्या निवडणुकात भाजपला मोठं यश मिळालं आहे. आम्ही महाविकास आघाडीची मत फोडली, असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केलं. तीन टर्म आमदार असलेल्या बाजोरियाना हरवून खंडेलवाल मोठ्या फरकाने विजयी झाले. बावनकुळेंच्या बाबतीत साई बाबांचं वाक्य खर श्रद्धा आणि सबुरीच फळ मिळालं आहे, असंही ते पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना म्हणाले.

“काँग्रेसने तर निवडणुकीचा पोरखेळ केला होता. आम्ही बिनविरोध करा म्हणत होतो. त्यांनी नागपूरमध्येही बाहेरून आणलेला माणूस त्यालाही फसवलं आहे. आता महाविकास आघाडीला माझं खुलं चॅलेंज आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवा. कायद्यात बदल करून रडीचा डाव खेळू नका”, असं आव्हानही चंद्रकांत पाटलांनी दिलं आहे.

“घोडेबाजार होऊनही भाजपाचा विजय”- प्रवीण दरेकर

नागपूर निवडणुकीत ऐनवेळी घोडेबाजार होऊन देखील भाजपाचाच विजय झाल्याचं दरेकर यावेळी म्हणाले. “नागपूर आणि अकोल्याच्या मतदारांचे मी आभार व्यक्त करतो. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपासून ज्या निवडणुका झाल्या, त्यात राज्यातील जनतेनं प्राधान्य भाजपाला दिलं. नागपूरच्या बाबतीत उमेदवार बदलणं आणि घोडेबाजार करूनही मतदारांनी भाजपालाच पाठबळ असल्याचं दाखवून दिलं. वसंत खंडेलवाल यांच्याकडेही वंचित, श्रमिक घटकांनी भाजपाच्या मागे उभे असल्याचं दाखवून दिलं. १७६ मतांनी बावनकुळे आणि १८६ मतांनी वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत”, असं दरेकर म्हणाले आहेत.

“या विजयाने महाविकास आघाडीला चपराक” – देवेंद्र फडणवीस

चंद्रशेखर बावनकुळेंच्या विजयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या विजयापेक्षाही जास्त आनंद झाल्याचं म्हटलं आहे. “आज मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेंना मोठा विजय मिळाला आहे. खरंतर मी स्वत: निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद आज बावनकुळेंच्या विजयाचा झाला आहे. या विजयाने महाविकास आघाडीला चपराक दिली आहे. अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. विधानपरिषदेच्या सहा पैकी चार जागी भाजपा निवडून आली आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळ्या प्रकारचे विजय होऊ शकतात, असं मांडलं जात असलेलं गणित चुकीचं आहे हेही या विजयानं स्पष्ट केलं आहे. राज्यातली जनता भाजपाच्या पाठिशी आहे आणि भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल. बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे”, असं फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrakant patil bjp on mlc elections pune vsk

ताज्या बातम्या