पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तेथील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपकडून देशभर जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रेला मुंबईनंतर आता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या यात्रेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपा राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी नारायण राणेंनी जनतेचं प्रेम कायम असल्याचं सांगितलं. तर चंद्रकांत पाटील आणि सुनिल देवधर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

“जन आशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर लोक खूश आहेत. पंढरपूर आणि साडे सहा हजार गावांमध्ये सत्ताधारी पराभूत झाले. आता यापुढे जिथे जिथे निवडणुका होतील, तिथे भुईसपाट होतील. या यात्रेतील प्रतिसादावरून दिसतंय.”, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“जनतेचा चांगला प्रतिसाद आहे. नारायण राणे यांच्याबद्दल लोकांमध्ये आजही तितकंच प्रेम आहे. नारायण राणेंच्या यात्रेला लोकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. त्यामुळेच सरकार आमच्यावर गुन्हे दाखल करत आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरे घाबरल्याचं दिसत आहे.”, असं भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी सांगितलं.