ॲपल कंपनीचे गॅजेट जितके लोकप्रिय असतात तितकेच उत्कंठावर्धक या गॅजेटचे अनावरण सोहळे अर्थात लाँच इव्हेंट असतात. त्यामुळे येत्या सात मे रोजी ‘लेट्स लूज’ नावाने सोहळा होणार असल्याचे ॲपलने जाहीर करताच, ‘आता काय नवीन’ हा प्रश्न ॲपलप्रेमी पंथियांना सतावू लागला आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रणावर असलेला आकर्षक लोगो नवीन आयपॅडच्या घोषणेकडे बोट दाखवत आहे. मात्र, त्याखेरीज नवीन शक्तिशाली प्रोसेसर, नवीन ॲपल पेन्सिल किंवा मॅजिक की-बोर्ड यांच्या घोषणेचीही शक्यता व्यक्त होत आहे. ॲपलने अलिकडेच चॅटजीपीटीपेक्षाही सक्षम ‘एआय’ बनवल्याचे जाहीर केले होते. त्याचाही नवीन गॅजेटमध्ये अंतर्भाव होणार का, याकडेही लक्ष लागून राहिले आहे. या शक्यता काय आहेत, ॲपलच्या इव्हेंटमध्ये काय असू शकेल याचा वेध…

नवीन आयपॅड मोठा, शक्तिशाली की अपग्रेड?

ॲपलचा शेवटचा आयपॅड येऊन दोन वर्षे लोटली आहेत. त्यामुळे ७ मे च्या कार्यक्रमात नव्या आयपॅडचीच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. विशेषत: या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरील लोगो त्याकडेच बोट दाखवतो. मात्र, हा आयपॅड कसा असेल, याबाबत ॲपलने नेहमीप्रमाणेच कमालीची गोपनीयता बाळगली आहे. अर्थात सध्याच्या आयपॅड प्रोपेक्षा तो अधिक वेगळा असेल, असे म्हटले जाते. सध्या आयपॅड प्रोमध्ये १२.९ इंचाची स्क्रीन असून एलईडी डिस्प्ले आहे. तर ११ इंची स्क्रीनच्या आयपॅड प्रोमध्ये एलसीडी डिस्प्ले आहे. मात्र, नवीन आयॅपडमध्ये ओएलईडी डिस्प्ले असेल अशी शक्यता आहे. याशिवाय तो आधीच्या आयपॅडपेक्षा वजनाने हलका आणि कमी जाडीचा असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… तुम्हाला डार्क चॉकलेटस् आवडतात का? कोण करतय या बाजारपेठेवर राज्य?

नवीन आयपॅड ‘एआय’ने सज्ज

७ मेच्या कार्यक्रमात ॲपल आयपॅडची नवीन श्रेणी जाहीर करेल, हे जवळपास निश्चित आहे. त्यामध्ये आयपॅड प्रो हे प्रमुख आकर्षण असेल. ११ इंच आणि १२.९ इंचाच्या आयपॅड प्रोमध्ये ‘एम फोर’ ही प्रोसेसर चिप असण्याची दाट शक्यता आहे. ही चिप विद्यमान प्रोसेसरपेक्षा अधिक वेगवान आहेच. पण त्यासोबतच त्यामध्ये कृत्रिम प्रज्ञेशी संबंधित वैशिष्ट्यांचा समावेश असेल, अशीही चर्चा आहे. नवीन आयपॅडमध्ये मेमरीही अधिक असेल, असे सांगितले जात आहे. तसेच आयपॅडच्या कॅमेऱ्याची जागाही बदलण्यात येऊ शकते. आयपॅडचा वापर व्हिडिओ कॉलसाठी करताना तो आडवा धरून संभाषण करता यावे, यासाठी कॅमेरा वरील बाजूच्या ऐवजी उभ्या कडेला असेल, असे सांगण्यात येते.

आयपॅड मॅकबुक बनणार?

ॲपलने आयपॅडच्या सुरुवातीपासून आतापर्यंत त्यात असे बदल करत आणले आहेत की आयपॅड हा एक प्रकारे मिनी लॅपटॉप ठरू शकेल. आयपॅडच्या स्क्रीनचा आकार वाढत असताना आता तो मॅकच्या जवळपास पोहोचू लागला असून भविष्यात वापरकर्त्यांना आयपॅड हा मॅकचा पर्याय वाटू शकतो. त्यासाठी ॲपल नवीन मॅजिक की-बोर्डची घोषणाही ७ मेच्या कार्यक्रमात करू शकेल. या की-बोर्डची बांधणी ॲल्युमिनियमच्या फ्रेममध्ये करण्यात आली असून तो आधीच्या की-बोर्डपेक्षा मजबूत असेल, असे म्हटले जाते. तसे असल्यास आयपॅड आणि मॅजिक की-बोर्ड ही जोडी मॅकबुकसारखीच कामगिरी करू शकेल.

हेही वाचा… पालघर, गुजरातमधील मच्छीमार पाकिस्तानच्या सागरी हद्दीत का जातात? पाकिस्तानी कैदेतून सुटका होण्यास विलंब का होतो?

ॲपल पेन्सिललाही नवे रूपडे?

ॲपलने बनवलेल्या लाेगोमध्ये ॲपल पेन्सिल ठळकपणे दिसून येते. त्यामुळे ॲपल पेन्सिलचाही नवा अवतार मंगळवारच्या कार्यक्रमात जाहीर होईल, असे दिसते. मात्र, ती कशी असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

ॲपलचा इव्हेंट कुठे पाहाल?

ॲपलचा हा सोहळा सात मे रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. ॲपलच्या वेबसाईटवरून किंवा यूट्यूब चॅनेलवरून तुम्हाला तो थेट पाहता येईल. हा सोहळा पूर्णपणे ऑनलाइन असेल.