वेकोलीच्या माजरी वसाहतीत दहावीतील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर आई व भावासमोर तिला जाळण्यात आले. यात ती ९१ टक्के जळाली होती़  अखेर चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या पीडित मुलीचा रविवारी नागपुरात मृत्यू झाल्याने चंद्रपुरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी चिनी ऊर्फ सूरज केवट (२५) याला अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.  
वेकोलीच्या माजरी वसाहतीतील एका सुखी कुटुंबाला २४ सप्टेंबरच्या रात्री अतिशय वाईट अनुभवाला समोर जावे लागले. वेकोलीत नोकरी करणारे वडील रात्रपाळीत कामावर असताना चिनी ऊर्फ सूरज केवट व त्याचे काही साथीदार रात्री उशिरा या पीडित मुलीच्या घरात शिरले. तेथे त्यांनी दहावीत शिकणाऱ्या या सोळा वर्षीय मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. यानंतर आई व भावासमोर मुलीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले आणि फरार झाले. या घटनेची माहिती वसाहतीत वाऱ्यासारखी पसरली. यानंतर या मुलीला सर्वप्रथम वेकोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु ९१ टक्के जळालेली असल्याने तिला तातडीने नागपूरला हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. यानंतर त्याच रात्री तिला नागपूरला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेल्या २५ सप्टेंबरच्या पहाटेपासून तिच्यावर या उपचार सुरू होते. मात्र, तिची प्रकृती अधिकच खालावली. सलग पाच दिवस मृत्यूशी झुंज देत असतानाच रविवारी सकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, तत्पूर्वी या मुलीने अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, ही बाब कुटुंबीयांजवळ बोलून दाखवली. त्यामुळेच मृत्युपूर्व जबानी नोंदविण्यासाठी तहसीलदारांना रुग्णालयात पाचारण करण्यात आले. त्यांच्यासमोर दिलेल्या जबानीत तिने चिनी ऊर्फ सूरज केवट व त्याच्या इतर सहकाऱ्यांनी नावे घेतली. पीडित मुलीचे मृत्युपूर्व बयाण लक्षात घेऊन माजरी पोलिसांनी आज चिनी ऊर्फ सूरज केवट याला अटक केली, तर त्याचे इतर सहकारी फरार आहेत. वेकोलीच्या कोळसा खाणींमुळे माजरी परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. काही वर्षांपूर्वी येथे मनसे नेत्याची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली होती. महिला व मुलींच्या दृष्टीने तर हा परिसर अतिशय असुरक्षित म्हणून ओळखला जातो.