महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील ४० आमदारांचा गट घेऊन पक्षातून बाहेर पडले. त्यांनी स्वतःचा वेगळा गट बनवला तसेच थेट शिवसेना पक्षावर दावा केला. त्यास निवडणूक आयोगाची मान्यताही मिळाली. हा नवा गट घेऊन त्यांनी महायुतीत प्रवेश केला. भाजपाच्या साथीने त्यांनी राज्यात सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ तीन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही मोठी फूट पडली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पक्षातील आमदारांचा मोठा गट बरोबर घेत बंडखोरी केली. या गटासह अजित पवार यांनीसुद्धा महायुतीत प्रवेश केला आहे. अजित पवार हे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ काँग्रेस पक्षही फूटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेसमधील काही नेते पक्षातून बाहेर पडणार हे निश्चित आहे, असं वक्तव्य अलिकडेच केलं होतं. काँग्रेसचं घर फुटणार हे मी वारंवार सांगतोय, असं शिरसाट म्हणाले होते.

संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे हे काही वेळापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिरसाट यांच्या दाव्याबद्दल विचारलं. त्यावर बावनकुळे म्हणाले, पक्षप्रवेशासाठी आम्ही कोणाच्याही घरी जाणार नाही. कुठलाही गट आणण्यासाठी आम्ही कुठेही जाणार नाही. परंतु, कोणी आमच्याकडे आलं तर आमचा दुपट्टा तयार आहे.

हे ही वाचा >> “संभाजी भिडे आणि आमचा…”, काँग्रेसच्या अटकेच्या मागणीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार महायुतीत गेल्यानंतर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विधानसभेत आता विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक आमदारांचं संख्याबळ आहे. परंतु काँग्रेसने अद्याप कुठल्याही नेत्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिलेली नाही. यावरून सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाकडून काँग्रेसवर टीका सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना याबद्दल प्रश्न विचारल्यावर बावनकुळे म्हणाले, २०२४ पर्यंत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरणार नाही. कारण, इतका संशय आणि इतकी वाईट परिस्थिती काँग्रेसची झालीय की, त्यांना विरोधी पक्षनेता बनवायची भिती आहे.