scorecardresearch

श्री रामनवमी उत्सवाची रथोत्सवाने उत्साहात सांगता; चाफळनगरीत प्रभू रामचंद्रांचा जयघोष

श्री क्षेत्र चाफळ (ता. पाटण) येथील प्रसिद्ध रामनवमी उत्सवाची रथोत्सवाने दिमाखात सांगता होताना अवघी चाफळ पंचक्रोशी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती.

चाफळ (ता. पाटण) येथील श्री रामनवमी उत्सवाची हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत रथोत्सवाने सांगता झाली. (छाया : उमेश सुतार, चाफळ)

कराड : श्री क्षेत्र चाफळ (ता. पाटण) येथील प्रसिद्ध रामनवमी उत्सवाची रथोत्सवाने दिमाखात सांगता होताना अवघी चाफळ पंचक्रोशी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. करोना महामारीमुळे सलग दोन वर्षे ही यात्रा रामभक्तांविना पार पडली होती. या खेपेस मात्र हजारो भक्तगण रथोत्सवात उत्साहात सहभागी झाले होते.

श्रीरामाची पट्टाभिषिक मूर्ती चांदीच्या पालखीतून वाजत-गाजत शेकडो मशालींच्या साक्षीने मंदिरास प्रदक्षिणा घालून रथाकडे आणण्यात आली. या वेळी समर्थ वंशज गादीचे मानकरी दुर्गाप्रसाद अयोध्यानाथ स्वामींच्या हस्ते रथपूजन झाले. बारा बलुतेदार व रथाचे मानकरी साळुंखे बंधूंना मानपानाचे श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

‘प्रभू रामचंद्र की जय’, ‘सत सत सीता राम की जय’, ‘बोल बजरंग बली की जय’ अशा जयघोषात मानाच्या सासन काठय़ांच्या साक्षीने चाफळला ३७५ व्या श्रीराम नवमी उत्सवाचा समारोप सूर्योदयाबरोबर साजरा करण्यात आला. समर्थ रामदास स्वामींनी सन १६४८ पासून सुरू केलेल्या श्रीरामनवमी उत्सवाला परंपरेप्रमाणे चैत्र शुद्ध गुढी पाडव्यापासून प्रारंभ झाला. यात्रा काळात नित्याने  आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले.  प्रभू रामचंद्रांचा जन्मसोहळा रविवारी पार पडल्यानंतर सोमवारी समर्थ सांप्रदायाची नगर प्रदक्षिणा (भिक्षावळ) झाली. मंगळवारी रथोत्सव साजरा करत उत्सवाची सांगता करण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chariot festival ramanavami celebrated enthusiasm praise lord ramchandra ysh

ताज्या बातम्या