राज्यातील गडकिल्ल्यांचे वैभव परत आले पाहिजे, अशी आमची भूमिका असून, यासंदर्भात आपली केंद्रीय पुरातत्व विभागाचे मंत्री महेश शर्मा यांच्यासमवेत चर्चा झाली आहे. भारतीय पुरातत्व सर्व्हेने राज्य पुरातत्व विभागाशी सामंजस्य करार करून त्याद्वारे किल्ल्यांचे गतीने संवर्धन करावे, अशी विनंती आपण केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रायगड येथे सांगितले.
रायगड किल्ल्यावर आयोजित रायगड महोत्सवाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय अवजड उदयोग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते, राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, रायगड जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश मेहता, आमदार भरत गोगावले, आमदार सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विनायक मेटे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दीडपट जादा निधी
छत्रपतींच्या काळातला रायगड उभा करूत आणि हे काम गतीने पूर्ण होण्यासाठी जेवढा निधी अर्थमंत्र्यांनी निश्चित केला आहे त्यापेक्षा दीडपट जादा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले
पाचाड गावात जलयुक्त शिवार योजना
पाचाड येथे जिजाऊच्या वाड्याचे संवर्धन करणे आवश्यक असून, याठिकाणी वर्षानुवर्षे असलेल्या पाणी टंचाईचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले की, पाचाड गावात जलयुक्त शिवार योजना संपूर्णपणे राबवून या भागातल्या तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात येईल. पुढील काळात या ठिकाणी पाण्याच्या टॅंकर्सची आवश्यकता भासणार नाही. आम्ही सगळे मंत्री या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत.
किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आराखडा
गडकिल्ल्यांचे वैभव परत मिळवून देण्यासाठी आमच्या सरकारने आराखडा तयार केला आहे. त्यात रायगड, शिवनेरी, तोरणा असे पाच किल्ले संवर्धनासाठी निवडले आहेत. याठिकाणी पर्यटकांना मार्गदर्शन होण्यासाठी तिथे पर्यटन केंद्र उभारण्यात येईल. याद्वारे किल्ल्यांचा इतिहास भाषांतरकराच्या माध्यमातून विविध भाषांत पर्यटकांना सांगितला जाईल. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभूती येईल, असेही फडणवीस म्हणाले.