Shivsena MLA Disqualification Verdict Updates : १६ आमदार अपात्र प्रकरणी येत्या काही वेळात निकाल येण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकालाचं वाचन करणार आहेत. दोन्ही पक्षकारांनी आपल्या बाजूने निकाल लागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, निकाल मेरिटवर आला पाहिजे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. बहुमत आमच्याकडे आहे. अधिकृत शिवसेना आमच्याकडे आहे. अधिकृत धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्यामुळे अध्यक्षांकडून अपेक्षा आहे की मेरिटप्रमाणे निकाल द्यावा, तीच आम्हाला अपेक्षा आहे.
दरम्यान, निकाल विरोधात गेला की दोन्ही पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. ठाकरे गटही सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारी आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही झालं की ते कोर्टात जातात. सकाळ, दुपार, संध्याकाळी ते कोर्टात जातात. कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तर कोर्ट चांगलं. कोर्टाने निकाल मेरिटवर दिला की कोर्ट वाईट. इलेक्शन कमिशनने त्यांच्या बाजूने निकाल दिला की ते चांगले. वाईट दिला की निवडणूक आयोग म्हणजे चुना आयोग. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?
हेही वाचा >> Shivsena MLA Disqualification Verdict: आमदार अपात्र ठरले, तर त्यांच्यासमोर कोणते पर्याय? वाचा काय म्हणतात घटनातज्ज्ञ…
काय आहे राहुल नार्वेकरांसमोरील प्रकरण?
शिवसेनेत २०२२ मध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अध्यक्षांकडे अपात्रता नोटीस सादर केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर न्यायालयानेही आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचं नमूद करत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात राहुल नार्वेकरांसमोरही सविस्तर सुनावणी झाल्यानंतर आज निकाल देण्यात येणार आहे.
“सर्वोच्च न्यायालय निकाल फिरवू शकते”
दरम्यान, राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालय फिरवू शकते, असं जुगल किशोर म्हणाले आहेत. “अध्यक्षांनी विहीत निकष पाळले नसतील, तर सर्वोच्च न्यायालय अध्यक्षांचा निर्णय फिरवू शकते. जर अध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला चुकीचा वाटला तर अशा प्रकरणांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकतं”, असं राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ वकील जुगल किशोर नमूद केलं.