scorecardresearch

कराडमध्ये बिबटय़ाच्या हल्ल्यातून बालक बचावले

राज धनंजय देवकर (५) असे बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे.

राज धनंजय देवकर (५) बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालक

कराड : सह्याद्रीच्या डोंगरपायथ्याला असलेल्या लोकवस्त्यांमध्ये वन्य व हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला असून, अलीकडेतर बिबटय़ांचे पशुधन व लोकांवरील हल्ले वाढल्याने लोकांमध्ये भयाचे वातावरण असतानाच किरपे (ता. कराड) येथे पाच वर्षांच्या बालकावर बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यावेळी या बालकाच्या वडिलांनी मोठय़ा धाडसाने आपल्या मुलाची सुटका केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

राज धनंजय देवकर (५) असे बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. किरपे येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास धनंजय देवकर हे शेतातील काम आटोपून मुलगा राज याचेसह घरी परतत होते. या वेळी बिबटय़ाने अचानक झडप घालून राज याची मान जबडय़ात पकडून त्यास फरपटत शेतात नेऊ लागला. हा प्रकार पाहून त्याच्या वडिलांनी मदतीसाठी आरडाओरडा

केला. त्यांनी धाडस दाखवत बिबटय़ाच्या तावडीतून आपल्या मुलाच्या सुटकेसाठी तिकडे धाव घेऊन बिबटय़ावर तुटून पडण्याचा पवित्रा घेतला आणि बिबटय़ा गोंधळून जाऊन शेताजवळच्या तारेच्या कुंपणाला धडकल्याने तो तोल जाऊन जागीच कोसळला. राज त्याच्या जबडय़ातून सुटला आणि बिथरलेला बिबटय़ा सैरभैर होऊन तेथून पळून गेला.

बिबटय़ाच्या हल्ल्यात राज याच्या मानेला व कानाचा लचका तोडला गेल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची खबर लागताच सहायक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. येणके येथे बिबटय़ाच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा लहान मुलावर झालेल्या हल्ल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन्य व हिंस्र प्राण्यांची लोकवस्त्यांमध्ये घुसखोरी होऊन होणारे प्राणघातक हल्ले थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Child rescued from leopard attack in karad zws

ताज्या बातम्या