‘‘सहा वर्षांपूर्वी १४ जून २००७ रोजी भर पावसात नाटय़ परिषदेविरुद्ध यशवंत नाटय़ संकुलात प्रायोगिक आणि बालरंगभूमीला जागा मिळावी यासाठी आम्ही लढा दिला होता. आमचे नेते विजय तेंडुलकर आणि दामू केंकरे आज हयात नाहीत; परंतु आमचा लढा थांबलेला नाही. या लढय़ातील मी एक महत्त्वाचा साथीदार असूनही नाटय़ परिषदेने अध्यक्षपदासाठी माझे नाव सुचवले. माझी त्याकरिता संमती घेण्यासाठी आलेल्या नाटय़ परिषदेच्या प्रतिनिधींना मी या लढय़ाची आठवण करून दिली. आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार परिषद व आम्ही करू आणि ही समस्या एकत्र बसून सामंजस्याने सोडवू. पुढच्या नाटय़ संमेलनापर्यंत आमच्या मागण्या मार्गी लागाव्यात अशी आशा आहे. दुर्दैवाने तसे झाले नाही, तर मी त्याची कारणे रसिकांपुढे ठेवीन; पण मी आशावादी आहे,’’ असे उद्गार ९४ व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले.