चिपळूण – चिपळूण नगर पालीका निवडणुकीचा निर्णय घेण्यासाठी शिवसेना भाजप मधील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू आहेत त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावळले जात आहे त्यामुळे पालीका निवडणुकीत महायुती ऐवजी युती होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग झाली. पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याची तयारी महायुतीमध्ये सुरू झाली आहे.
चिपळूण पालीका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुढील दोन दिवसात सुरुवात होणार आहे. मात्र महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अजून ठरलेला नाही. या पदासाठी महायुती मधील तिन्ही पक्षांमध्ये सक्षम उमेदवार आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी एका प्रभागात तीन ते चार जण इच्छुक आहेत. महायुती म्हणून निवडणूक लढवायची झाल्यास शिवसेनेला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस साठी काही जागा सोडावे लागतील. जागावाटपाच्या या प्रक्रियेत शिवसेनेला आपल्या हक्काच्या जागाही मित्र पक्षाला द्यावे लागतील त्यामुळे महायुती झाली तर सर्वाधिक नुकसान शिवसेनेचे होणार आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी शिवसेना पालिका निवडणुकीत केवळ भाजपला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. नुकतेच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली त्यात नगराध्यक्ष पद शिवसेनेला देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये महायुतीत आपल्याला डावळले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.
पालकमंत्री उदय सामंत आणि चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्यातील दुरावा अजून संपलेला नाही असे यातून दिसून येत आहे. राजापूर मधील ठाकरे गटाचे अजित यशवंतराव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. अजित यशवंतराव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत जहरी टीका केली होती. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये घेण्यास पालकमंत्री सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांचा विरोध होता. तो डावलून यशवंतराव यांना सत्तेत घेतल्यानंतर सामंत आणि निकम यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. दोन्ही नेत्यांनी हे मतभेद उघडपणे जाहीर केले नाही परंतु अंतर्गत संघर्ष स्पष्ट दिसत आहे. त्याच रागातून राष्ट्रवादीला महायुती बाहेर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.
पालकमंत्री सामंत यांनी पूर्वी शरद पवार गटात असलेले आणि आता भाजपचे नेते असलेले प्रशांत यादव यांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे. प्रशांत यादव हे शेखर निकम यांचे विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. भाजपच्या स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यादव आघाडीवर आहे. यादव भाजपची ताकद ओळखूनच शिवसेनेकडे जागा मागतील मात्र राष्ट्रवादीचा दावा शिवसेनेला परवडणारा नाही. त्यामुळे चिपळूण पालिका निवडणुकीत महायुती ऐवजी युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चिपळूण पालिका निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू आहेत. नगराध्यक्ष आणि जागा वाटपाचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. – प्रशांत यादव नेते भाजप
