चिपळूण – पतीच्या निधनाची बातमी कानावर पडताच पत्नीने ही प्राण सोडल्याची खळबळजनक घटना चिपळूण तालुक्यातील निवळी येथे घडली. पती-पत्नीने एकाच दिवशी अखेरचा श्वास घेतल्यावर या दांपत्याच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्यावर सोमवारी चिपळूण शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात करण्यात आले.
मनोहर श्रीपतराव सुर्वे (वय ९१) आणि संगीता मनोहर सुर्वे (वय. ८१ )असे या पती-पत्नीचे नाव आहे. चिपळूण तालुक्यात प्रथमच अशी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनोहर सुर्वे १९९२ मध्ये रिझर्व बँकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर गावी आले. त्यांची पत्नी संगीता गृहिणी होती. गावी आल्यानंतर सुर्वे पूर्ण वेळ शेती आणि सामाजिक कामात अग्रेसर होते. मात्र वय झाल्यानंतर मागील काही वर्ष ते या सर्व पासून अलिप्त होते. त्यांचा एक मुलगा विनायक हा मुंबईमध्ये खाजगी नोकरी करतो. मुलगी मीनाक्षीचे लग्न झाले आहे. दुसरी मुलगी नलिनीचे लग्न व्हायचे होते.
गेल्या अनेक वर्षापासून सुर्वे दांपत्याचा एकत्र संसार सुरू होता. काही दिवसापासून सुर्वे दांपत्य आजारी असायचे. त्यामुळे त्यांचा मुलगा विनायक हा महिन्यातून दोन वेळा गावी यायचा. रविवारी सुर्वे चिपळूण मधील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. डॉक्टरांनी त्यांची तब्येत चांगली असल्याचे सांगितले होते. त्यांची पत्नी संगीता ही सावर्डे येथील एका रुग्णालयात उपचार घेत होती. तिची प्रकृती नाजूक असल्यामुळे तिला मुंबईला अधिक उपचारासाठी घेऊन जायचे ठरले होते. नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था ही केली होती. मुलगा विनायक याची सर्वजण वाट पाहत होते. सकाळी सव्वा नऊ वाजता चिपळूण मधून मनोहर सुर्वे यांच्या निधनाचे वृत्त आले.
आपल्या पतीच्या निधनाचे वृत्त सहन न झाल्यामुळे पत्नी संगीता हिनेही दुपारी सव्वा बारा वाजता आपले प्राण सोडले. दोघांनी आपले निधन झाल्यावर अंतिम विधी चिपळुणातील रामतीर्थ स्मशानभूमीत व्हावेत असे यापूर्वीच लिहून ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांची मुले व नातेवाईकांनी सुर्वे दाम्पत्याची अंतिम इच्छा सर्वांना सांगितली. त्यानुसार सर्वांनी या दोघांवर शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. या दाम्पत्याच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्यावर सोमवारी शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.