scorecardresearch

“संजय राठोडला मंत्रीपद देणं दुर्दैव, तो मंत्री झाला असला तरी…”; भाजपाच्या चित्रा वाघ मंत्रिमंडळ विस्तार सुरु असतानाच संतापल्या

पूजा चव्हाण हत्या प्रकऱणामध्ये संजय राठोड यांचं नाव पुढे आल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

“संजय राठोडला मंत्रीपद देणं दुर्दैव, तो मंत्री झाला असला तरी…”; भाजपाच्या चित्रा वाघ मंत्रिमंडळ विस्तार सुरु असतानाच संतापल्या
ट्विटरवरुन मांडली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४० दिवसांनी पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये पूजा चव्हाण प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीच्या नेता चित्रा वाघ यांनी राठोड यांना मंत्रीपद देणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. राठोड यांनी शपथ घेतल्याच्या पुढल्याच मिनीटाला चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली.

नक्की वाचा >> ४४ हजार २७० कोटींचा मालक आहे शिंदे सरकारमधील ‘हा’ मंत्री; पहिल्यांदाच मंत्रीमंडळामध्ये मिळालं आहे स्थान

“पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. तसेच, “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय. त्यांनी या ट्विटमध्ये ‘लडेंगे… जितेंगे’ असं म्हणत मुख्यमंत्री कार्यलायच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे.

नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत

पूजा चव्हाण प्रकरण काय?
मूळची बीड जिल्ह्यातील परळीच्या असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. पूजाने पुण्यातील मोहम्मदवाडी भागातील हेवन पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली. पूजासोबत राहणाऱ्या दोन जणांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान तिला मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणावरून राज्यात प्रचंड गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं होतं.

नक्की वाचा >> “स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे…”; शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रीमंडळ पाहून सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त करत नोंदवली प्रतिक्रिया

भाजपाने थेट संजय राठोड यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळेच आज संजय राठोड यांनी शपथ घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी उघडपणे त्याला विरोध केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.