उर्फी जावेद प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसारमाध्यमांनी याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, “महिला महिलांमध्येच हा वाद सुरू आहे. या प्रकरणात आम्ही कोणी काही बोलतोय का? आम्ही त्यात भाग घेतलाय का? आम्ही तर महिलांना संधी देतोय, पण त्या संधीचं सोनं करायचं की राख करायची? हे त्यांच्या हातात आहे,” असं स्पष्ट मत अजित पवारांनी व्यक्त केलं. यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्याला अजित पवारांची भूमिका सर्वाधिक आवडली, असं विधान केलं आहे. त्यांनी अजित पवारांच्या भूमिकेचं स्वागत करत रुपाली चाकणकरांना उपरोधिक टोला लगावला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

हेही वाचा- “माझ्याकडून बोलण्याच्या ओघात चूक झाली”, ‘त्या’ विधानावर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त

उर्फी जावेद प्रकरणावर भाष्य करताना चित्रा वाघ म्हणाल्या, “आमचा विरोध त्या बाईला नाही, तिच्या नंगानाचला आहे, जो सार्वजनिक ठिकाणी सुरू आहे. आपल्या प्रत्येकाला लेकी आहेत, त्यांच्यासमोर आपण कुठला आदर्श ठेवणार आहोत? कुठला आदर्श आपण आपल्या मुलींना दाखवणार आहोत? ही माझी भूमिका आहे,” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

हेही वाचा- “अरे आधी कपडे तरी घाला, मग…”, रुपाली चाकणकरांच्या ‘त्या’ विधानावर चित्रा वाघ यांचा खोचक टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांना उद्देशून चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, “उर्फी जावेद प्रकरणी मला सगळ्यात जास्त आमच्या अजितदादांची भूमिका आवडली. एकदम रोखठोक भूमिका… जे असेल ते तोंडावर बोलतात. काल मी अजितदादांची एक प्रतिक्रिया ऐकली, यामध्ये दादा म्हणाले आम्ही महिलांना पदं देतो, म्हणजे त्यांच्या पक्षातल्या बरं… त्याचं सोनं करायचं की माती करायचं हे त्यांनी ठरवायचं. म्हणजे अजितदादांच्या लक्षात आलंय की, त्यांनी दिलेल्या पदाची माती केली जात आहे. त्यामुळे अजितदादांनी जी भूमिका मांडली त्याचा फार चांगला अर्थ आहे. त्यांना तो पटलाय,” असा उपरोधिक टोला चित्रा वाघ यांनी लगावला.