जागतिक तापमानवाढीमुळे (ग्लोबल वॉर्मिंग) शेतीसमोर संकट उभे राहिले आहे. पण त्याला तोंड देता येईल, असे संशोधन कृषी शास्त्रज्ञांनी सुरू केले आहे. केवळ थंडीच्या काळातच येणारे हरभऱ्याचे पीक आता उन्हाळ्यातही घेता येईल, असे वाण हैदराबाद येथील ‘इक्रीसॅट’ या संस्थेने संशोधित केले आहे. नव्या संशोधनामुळे डाळींमध्ये देश स्वयंपूर्ण तर होणार आहेच पण हरभऱ्याची निर्यातही करू शकेल.

हरभरा पिकाला थंडी आवश्यक असते. त्यामुळेच मोरोक्को, सीरिया, ऑस्ट्रेलिया या थंड प्रदेशात हरभऱ्याचे उत्पादन होते. देशात मात्र १५ ते २५ डिग्री अंश सेल्सिअस तापमान त्याकरिता पोषक असते. पण आता ४० अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असतानाही हे पीक घेता येणार आहे. रब्बीतच नव्हे तर उन्हाळ्यातही अगदी मार्च महिन्यात त्याची लागवड करता येईल. त्यामुळे उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडूसारख्या राज्यांत त्याचे उत्पादन वाढणार आहे. ‘इक्रीसॅट’चे संशोधन संचालक डॉ. सुहास वाणी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना या नव्या संशोधनाची माहिती दिली.

मागील वर्षी ९.९३ दशलक्ष टन इतके हरभऱ्याचे उत्पादन झाले. यंदा ९.७५ दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशात चालू रब्बी हंगामात एक कोटी हेक्टरवर हरभऱ्यांची लागवड झाली. ती आतापर्यंतची सर्वात विक्रमी लागवड आहे. हरभरा, तूर, मसूर, उडीद आदी सर्व डाळींची देशाची गरज २३ दशलक्ष टनांची आहे. मात्र १७ ते १८ दशलक्ष टन डाळीचे उत्पादन होत असल्याने ५ दशलक्ष टन डाळीची आयात मोरोक्को, सीरिया, ऑस्ट्रेलिया आदी देशांतून करावी लागते. गेल्या दोन वर्षांपासून आयातीची गरज पडलेली नाही.

चांगल्या पावसामुळे हे घडले आहे. मात्र भविष्यात जागतिक तापमानवाढीमुळे डाळीची समस्या निर्माण होईल, असे तजॉज्ञांचे मत होते. आता ‘इक्रीसॅट’ने केलेल्या संशोधनामुळे या समस्येचा मुकाबला तर करता येणार आहेच पण डाळीची निर्यात करणेही शक्य होणार आहे.

अनुजैविक संकरित वाणनिर्मिती (मोलॅक्युलर असिस्टंट ब्रीडिंग) या तंत्राचा वापर करून हरभऱ्याची नवी जात ‘इक्रीसॅट’ने विकसित केली आहे. या वाणाच्या अंतिम चाचण्या झाल्या असून लवकरच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून या वाणाला मान्यता मिळणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना लागवडीसाठी दोन ते तीन वर्षांत हे बियाणे उपलब्ध होणार आहे. संकरित बियाणांच्या निर्मितीपेक्षा हे अनुजैविक संकरित वाणनिर्मितीचे तंत्र वेगळे आहे. हरभऱ्याच्या वाणातील जनुक हे नव्या वाणात संकर करून वापरले जाते. ही पद्धत पूर्वीपासून प्रचलित असून आता त्याचा संशोधनात मोठय़ा प्रमाणात वापर सुरू झाला आहे. जनुकबदल पिकांना (जीएम तंत्र) बंदी असल्याने या तंत्राचा वापर कृषी संशोधन संस्थांमध्ये सुरू केला आहे.

काय होईल या नव्या वाणामुळे..

देशात झारखंड, ओरिसा, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये तांदळाच्या पिकानंतर दुसरे पीक घेतले जात नाही. एक दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त जमीन केवळ एक हंगामी असून ती बरेच महिने पडीक असते. पण आता तांदूळ निघाल्यानंतर जानेवारी ते मार्च या कालावधीत हे पीक घेता येईल. त्यामुळे यापुढे डाळीची आयात करण्याची गरज भासणार नाही. उलट निर्यात करता येईल. कर्नाटक, राज्यातील मराठवाडा व विदर्भ, आंध्र प्रदेश या राज्यांत कपाशीनंतर उन्हाळी हंगामात हरभरा करता येईल.

अनुजैविक संकरित वाणनिर्मितीचे तंत्र जुनेच..

हरियाणामध्ये बाजरीवरती गोसावी (बुवा व डावनी) हा रोग आला. तेव्हा १९७५ मध्ये या तंत्राने नवे वाण विकसित केले. बाजरीच्या एका वाणात दुसऱ्या रोगप्रतिकारक वाणातील जनुकाचे प्रत्यारोपण संकरित वाणनिर्मिती पद्धतीतूनच केले जाते. रोगप्रतिकारक वाणाच्या पानातील जनुकमॅपिंग करून त्यातील प्रोटीन पॅटर्न तपासला जातो. या तंत्राने बाजरीतील गोसावी रोग घालविण्यात आला. आता हरभऱ्याबरोबरच भुईमुगावरील टिक्का, तुरीवरील मर याला प्रतिकारक वाण ‘इक्रीसॅट’मध्ये संशोधित करण्यात आले आहेत. लवकरच सहा वाणांना मंजुरी मिळेल.    – डॉ. सुनील वाणी, संशोधन संचालक, इक्रीसॅट