करोना रुग्णआलेख घसरू लागल्याने सर्व शाळा सुरू करण्याबाबत राज्यभरातून दबाव वाढू लागला आहे. ग्रामीण भागांतील पाचवी ते बारावी आणि शहरी भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग आधीच सुरू आहेत. आता पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागांत तर शिक्षक, शाळाचालक, पालक अशी सर्वच मंडळी त्यासाठी आग्रही आहेत. त्यानंतर आता राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सनेही पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

“चाईल्ड टास्क फोर्सने स्पष्टपणे सांगितले आहे की पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयोगटामार्फत विषाणू परसरण्याची शक्यता आहे. मात्र १२ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर शैक्षणिक संस्थामध्ये जाण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. तसेच पहिली ते चौथीचे वर्ग सर्व अटीशर्थींसह सुरु करण्याची परवानगी देण्याची सूचना चाईल्ड टास्क फोर्सने केली आहे. याबाबत विचार सुरु असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

कोव्हॅक्सिन ही मुलांना देण्यात कोणतीही अडचण नाही असे तज्ञ्जांचे मत आहे. राज्यात लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, फक्त केंद्र सरकारने लहान मुलांचे लसीकरण करण्याबाबत परवानगी दिली तर राज्याची तयारी आहे. राज्यात दररोज ७०० ते ८०० रुग्ण आढळत आहेत. राज्याचा पुनर्प्राप्ती दर ९८ टक्के आहे. तर मुलांमध्ये गंभीर आजाराचं प्रमाण असं कुठेही नाही. त्यामुळे पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे राजेश टोपे म्हणाले.

राज्यात ५० टक्के आसन क्षमतेची परवानगी सिनेमागृह आणि नाट्यगृहांना देण्यात आली आहे. त्यामुळे या पेक्षा स्थिती बदलली तर निर्बंध आणखी कमी करण्यात येतील. कोविड कमी झाला असला तरी मोठ्या प्रमाणात गर्दी व्हावी, सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडावा असा होत नाही. सध्या जर्मनी, ऑस्ट्रिया, अमेरिकेमध्ये डेल्टा वायरसचा प्रादुर्भाव दिसत आहे. पुढच्याला ठेच मागचा सावध या युक्तिप्रमाणे बेफिकीर राहून चालणार नाही, करोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राज्यात डेल्टा व्हेरिएंटऐवजी आता दुसरा नवा कोणता व्हेरिएंट दिसून आलेला नाही. तपासणीमध्ये कोणताही नवा व्हेरिएंट राज्यात आढळलेला नाही. तज्ज्ञांनी सांगितलं आहे की तिसरी लाटेची शक्यता जरी असली तरी त्यांची तीव्रता कमी असेल. पण करोनाचे नियम तंतोतंप पाळणे आणि १०० टक्के लसीकरण करणे या दोन गोष्टी आपल्याला पुढच्या काळातही करत राहाव्या लागतील,” असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.