विरोधकांचे घोटाळे काढणार!

आमच्या सरकारने तीन वर्षांत काय केले आणि आघाडी सरकारने पंधरा वर्षांत काय केले याचा लेखाजोखा मांडणार आहे

नागपूर येथे सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्र्यांचा इशारा; सिंचन घोटाळ्यात आणखी गुन्हे दाखल करण्याची तयारी

विरोधकांकडे सरकारवर टीका करण्यासाठी काहीच मुद्दे नसल्याने तेच तेच आरोप करण्याची त्यांची झेप सैराटपर्यंतच आहे. राज्यात काय चाललेय याची त्यांना कल्पना नाही. शेतकरी कर्जमाफी, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावणे तसेच राज्यातील अन्य सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यास सरकार सक्षम आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हल्लाबोल यात्रा करणाऱ्या विरोधकांच्याच आजवरच्या डल्लामार यात्रेचा बुरखा फाडणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत चार गुन्ह्य़ांत काही जणांवर आरोपपत्र दाखल झाले असून आणखी काही जणांवर लवकरच गुन्हे दाखल होणार असल्याचे जाहीर करीत त्यांनी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सूचक इशाराही दिला.

सरकारने जनतेचा विश्वास गमावल्याचा आरोप करीत विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला.

या अधिवेशनात आमच्या सरकारने तीन वर्षांत काय केले आणि आघाडी सरकारने पंधरा वर्षांत काय केले याचा लेखाजोखा मांडणार आहे. सरकारवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या  विरोधकांच्याच डल्लामार यात्रेचे पुरावेच सभागृहात सादर करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दोन्ही काँग्रेसने १५ कधी प्रामाणिकपणे कारभार केला नाही, त्यामुळेच घोटाळे करणाऱ्यांचा प्रामाणिकपणे सरकार राबवीत असलेल्या योजनांवर विश्वास बसत नाही. सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत काही जणांविरोधात आरोपपत्र दाखल झाले असून अजून काही जणांवर लवकरच गुन्हे दाखल होतील. अशाच प्रकारे पाच हजार कोटींच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यातही कारवाई होत असून ज्या ज्या चौकशा सुरू आहेत त्याची प्रगतीही सभागृहात देणार असल्याचे सांगताच विरोधकांना लवकरच आणखी काही धक्के देण्याचे संकेतही त्यांनी दिले.

कर्जमाफीचे पैसे चार दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर

राज्याचे दरडोई उत्पन्न वाढले असल्याने कर्ज घेण्याची क्षमताही वाढली आहे. सरकारने सिंचन प्रकल्प आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कर्ज उभारले असले तरी ते १६ टक्क्यांच्या आत आहे. आजमितीस राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत असला तरी त्याची विरोधकांनी चिंता करू नये, असेही त्यांनी सुनावले. आतापर्यंत कर्जमाफी योजनेंतर्गत ४१ लाख शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली असून येत्या चार दिवसांत या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. कर्जमाफीचा विदर्भ आणि मराठवाडय़ाला अधिक लाभ झाला असून कर्जमाफीस पात्र असलेल्या मात्र अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cm devendra fadnavis open opposition scam in winter session

ताज्या बातम्या