CM Devendra Fadnavis On Yavat Violence : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला होता. सोशल मीडियावर एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर दोन गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून ही घटना घडण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मी एका कार्यक्रमात होतो. मात्र, तरीही आताच मी यवतच्या प्रकरणाबाबत माहिती घेतली. त्या ठिकाणी एका बाहेरच्या व्यक्तीने चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला. कोणत्यातरी पुजाऱ्याने बलात्कार केला वैगेरे अशा आशयाचं स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील करावा लागला. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

“सध्या दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसले आहेत. तणाव संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्या ठिकाणी तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना काहीजण घडवताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सभा झाली आणि त्यानंतर स्टेटस ठेवल्यानंतर तणाव वाढल्याची चर्चा असल्याचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला असता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “सभा झाल्यानंतर अशा प्रकारचं स्टेटस ठेवण्यासाठी कोणाला परवानगी दिली आहे का? अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने एखाद्या धर्मावर किंवा एखाद्यावर अशी टीका करण्याचा अधिकार कोणालाही नाही. या सभेचा आणि या घटनेचा संबंध जोडण्याचं काही कारण नाही. या ठिकाणी सभा झाली म्हणून हे केलं असं कोणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार नाही”, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

“सध्या यवतमध्ये शांतता आहे. तसेच तेथील तणावाचे व्हिडीओ हे तेथीलच आहेत की बाहेरचे आहेत? हे देखील तपासावं लागेल. या घटनेची चौकशी केली जाईल. मात्र, जनतेला माझं आवाहन आहे की, सर्वांनी शांतता ठेवली पाहिजे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.