CM Devendra Fadnavis slam Rahul Gandhi over allegations on ECI : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोग व देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला असून त्यासंदर्भातले काही पुरावेदेखील सादर केले. दरम्यान या आरोपांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून राहुल गांधी खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरून फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब- हायड्रोजन बॉम्ब सांगितला, तर अख्खा भारत घाबरलेला होता की आता हे कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार, पण लवंगी फटाका देखील ते फोडू शकले नाहीत. त्यांनी फुसका बार लावला आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मी यापूर्वीही सांगितलं राहुल गांधी हे सीरियल लायर आहेत. रोज खोटं बोलायचं आणि गोबेल्सचं (हिटलरच्या पक्षाचा प्रचारक) तत्व मांडायचं हा प्रयत्न त्यांचा असतो. इतके वेळा निवडणूक आयागाने त्यांना नोटीस दिली ते एकही पुरवा आजपर्यंत देऊ शकले नाहीत. तरीही राहुल गांधींचं एका गोष्टीसाठी कौतुक करतो, की प्रत्येक वेळी माध्यमांसमोर येऊन खोटं बोलण्याची त्यांची हिंमत खरोखरोच वाखाणण्याजोगी आहे. अशा प्रकारचा नेता मी यापूर्वी कधीही बघीतलेला नाही,” असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
राहुल गांधींना लोकांमध्ये जावे लागेल त्याशीवाय निकाल त्यांच्या बाजूने लागणार नाहीत असेही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. “ते कितीही खोटं बोलले तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना जनतेतच जावे लागेल. जनतेत जातील तरच निवडणुकींचे निकाल कदाचित कधीतरी त्यांच्या बाजूने येतील. पण असेच खोटे बोलत राहिले तर कधीच त्यांच्या बाजूने निकाल येऊ शकत नाही,” असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राचा मुद्दा कशासाठी?
राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा वारंवार का उपस्थित करत आहेत? याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रातील पराभव त्यांना जिव्हारी लागला आहे. त्यांना फार अपेक्षा होती. त्यांनी हॉटेलही बूक करून ठेवले होते. त्यांनी मंत्रिमंडळाची रचना देखील केली होती. काँग्रेसमध्ये अनेक मुख्यमंत्री देखील तयार झाले होते आणि अशातच त्यांना जो जनतेने झटका दिला त्यातून ते अजून वर येऊ शकलेले नाहीत. त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या संदर्भात केलेली सगळी वक्तव्य खोटी निघाली. सगळी वक्तव्य ही पुराव्याविना केली होती आणि त्याचे पुरावे निवडणूक आयोगाने तात्काळ दिल्याने ते तोंडावर आपटले आहेत.”