मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदार आणि खासदार कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. या दौऱ्यासाठी शिंदे गटातील आमदारांसह त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत गेले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास १८० जण कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्याची माहिती मिळत आहे. पण आता मुख्यमंत्र्यांच्या या गुवाहाटी दौऱ्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत गुवाहाटी दौऱ्याबाबत सवाल उपस्थित केला आहे. गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे गटातील आमदारांनी चार्टर्ड विमानांचा वापर केला असावा. तसेच त्यांनी गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेल रॅडिसनमध्ये राहण्याची व्यवस्था केली असावी. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिंदे गटाकडे इतके पैसे कुठून आले? याचा तपास केला जावा, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

हेही वाचा- “ज्या माणसाने दारू पिऊन…” जितेंद्र आव्हाडांची गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार टीका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि एसीबी (अँटी करप्शन ब्युरो) या तपास यंत्रणांना टॅग करत अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे, त्यांचे आमदार आणि खासदार यांनी आज गुवाहाटीला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाचा वापर केला असावा. तसेच त्यांची रॅडिसन हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली असावी. ही व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याकडे इतके पैसे कुठून आले? याचा तपास ईडी किंवा एसीबी करू शकेल का? प्रसारमाध्यमेही त्यांना हा प्रश्न विचारू शकतील का? असं दमानिया यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.