राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक करुन त्याची चौकशीनंतर सुटका केली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री शिंदेंच्या हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती दिल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा येथून लोणावळा पोलिसांनी ३६ वर्षीय अविनाश अप्पा वाघमारेला त्याबात घेतलं. मूळचा घटकोपर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील साठे चाळीतील रहिवासी असलेल्या वाघमारेने पोलिसांना असा फोन का केला होता यासंदर्भातील विचित्र माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: शिवसेनेचे तीन खासदार, चार आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? उद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का?

लोणावळ्यातील एका हॅाटेलमध्ये रविवारी (२ ऑक्टोबर) दुपारी वाघमारे हा जेवणासाठी आला होता. त्यावेळी त्याने हॅाटेलमध्ये दारु प्यायली. नंतर दारुच्या नशेतच त्याने पिण्याच्या पाण्याच्या बाटलीवरुन हॉटेल मालकाशी वाद घातला. पाण्यावरुन झालेल्या वादातून हॉटेल चालकाला त्रास देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या १०० या आप्तकालीन क्रमांकावर फोन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला जात असल्याचा बनावट माहिती अविनाशने दिली. लोणावळ्यामधील याच हॉटेलमधून अविनाशने हा फोन केला होता.

हॉटेल मालक किशोर पाटील यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. “तो (आरोपी अविनाश) मुंबईवरुन कवठेमहांकाळ चालला होता. तो इथं आला हॉटेलला जेवला. त्याला थंड पाणी हवं होतं. मात्र आमच्याकडे थंड पाणी त्यावेळी नव्हतं. त्यावरुन त्याने वाद घातला,” असं पाटील यांनी सांगितलं. हॉटेल मालकाने अविनाशला बाजूच्या दुकानातून थंड पाणी घेण्याचा सल्ला दिला किंवा हॉटेलमधील साधं पाणी घ्यावं असं सांगितलं. “मात्र तो थोडा वेडसर असल्याप्रमाणे वागत होता. त्याने मद्यपान केलं होतं. त्याने हॉटेलचे फोटो वगैरे काढले. आरोही ट्रॅव्हल्सचा माणूस होता होता. मी मॅनेजरला फोन करुन चालकाचा क्रमांक घेतला. तो पोलिसांना दिला. पोलिसांनी त्याला नाशिक फाट्यावरुन पकडून आणलं,” असं किशोर पाटील यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला सांगितलं.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘काल रात्री या…’; शिंदे गटात जाण्याची चर्चा असतानाच मिलिंद नार्वेकरांनी शेअर केले फोटो

पोलीस यंत्रणा आणि हॉटेल चालकाला त्रास दिल्याबद्दल अविनाश वाघमारेविरोधात कलम १७७ अंतर्गत लोणावळा पोलीस स्थानकामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर अविनाश वाघमारेला आरोपीला सोडून देण्यात आलं आहे. अविनाश वाघमारेला घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. अविनाश वाघमारेच्या पत्नीने प्रसारमाध्यमांशी बोलताना, “तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. त्याचं डोकं चालत नाही. तो फार मद्यपान करतो,” असं सांगितलं. “मामाचं निधन झाल्याने तो गावी चालला होता. पाण्याच्या बाटलीवरुन काहीतरी वाद झाला म्हणून त्यांनी खोटा कॉल केला. मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं सांगून पोलिसांनी चौकशीनंतर त्याला सोडून दिलं आहे,” असंही वाघमारेच्या पत्नीनं म्हटलं आहे.