एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना राज्यात पाहायला मिळत आहे. यामध्ये बंडखोरी, गद्दारी, ५० खोके अशा अनेक मुद्द्यांची चर्चा चालू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे या आगीत तेल पडलं आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शनिवारी तळेगावमध्ये जनआक्रोश यात्रा काढली. त्यावरून आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं असून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तसेच, केसरकरांनी उद्धव ठाकरेंनाही सूचक शब्दांत इशारा दिला आहे.

सत्ता गेली म्हणून दौरे

आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरत आहेत. उद्धव ठाकरेही दसरा मेळाव्यानंतर नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकरांनी टोला लगावला आहे. “तुमची सत्ता गेली म्हणून आज तुम्ही हे करत आहात. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येही येत नव्हता. आज सत्ता गेल्यानंतर तुम्ही घरोघर फिरायला लागले आहात”, असं केसरकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

उद्योगपती मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर झाली चर्चा?

उद्धव ठाकरेंवर आगपाखड

दरम्यान, यावेळी बोलताना केसरकरांनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं. “शिवसैनिकांना साधी तुमची भेट मिळत नव्हती. आमच्यासारखे ज्येष्ठ आमदार वर्षाच्या समोर रस्त्यावर उभे राहात होते. ही परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रावर आणली होती. आता तुम्ही लोकांना खोटं सांगत फिरता. त्याामुळे आता आम्हालाही खरं सांगत महाराष्ट्रभर फिरावं लागेल. पण आम्ही आमची कामं सांभाळून ते लोकांना सांगू. कामं ठेवून आम्ही आमच्या यात्रा काढणार नाही. माझी यात्रा असताना मी शाळांना भेटी दिल्या आहेत. आमच्या विभागाच्या बैठका घेतल्या आहेत. एवढं काम आम्ही दिवसरात्र करतो”, असं दीपक केसरकर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरेंचं टीकास्र

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी शनिवारी जनआक्रोश आंदोलनात शिंदे गटावर तोंडसुख घेतलं. “महाराष्ट्रात येऊ शकणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. वेदान्त-फॉक्सकॉन, बल ट्रक पार्क आणि मेडिसिन डिव्हाईस पास्क हा प्रकल्पही आता महाराष्ट्रातून निघून गेला आहे. या खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत, गुंतवणूक कोण घेऊन येतंय याकडे कुणाचंच लक्ष नाहीये”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.