ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख ‘मोगॅम्बो’ असा केला होता. या विधानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी अमित शाह यांना ‘मिस्टर इंडिया’ म्हटलं असतं, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीकास्र सोडताना एकनाथ शिंदे म्हणाले, “देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३७० कलम हटवलं. त्यांच्याविरोधात काही विरोधक वक्तव्य करतात, त्यांना ‘मोगॅम्बो’ म्हणतात. ‘मोगॅम्बो’ हा ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील व्हिलन होता. पण बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी अमित शाहांना ‘मिस्टर इंडिया’ म्हटलं असतं. त्यांचा सन्मान केला असता. यासाठी मोठं मन लागतं, याला कद्रुपणा चालत नाही.”

हेही वाचा- “मोगॅम्बोच्या अनेक पिढ्या आल्या तरी…”, उद्धव ठाकरेंचं अमित शाहांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र!

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून टीका केली. अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राहुल गांधी यांनी वारंवार सावरकरांचा अपमान केला. आजही राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. सावरकर हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे दैवत आहेत. त्यांनी मरण यातना भोगल्या आहेत. त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांना कोलूला जुंपलं. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हालअपेष्ठा सहन केल्या. त्यामुळे राहुल गांधींनी एक दिवस त्या सेल्युलर जेलमध्ये राहून यावं. अर्धा-एक तास त्यांना घाण्याला (कोलू) जुंपलं तर त्यांना सावरकरांच्या यातना काय आहेत, ते कळतील. म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “आजही राहुल गांधींनी म्हटलं, माफी मागायला मी सावरकर नाही. पण तुम्ही सावरकरांना काय समजता? असा माझा सवाल आहे. म्हणून त्यांना त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं, त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.”