एरवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले की, कुठेही जायचे असेल तर त्यांच्या मागे-पुढे सतत दहा बारा गाडय़ांचा ताफा, सुरक्षा रक्षकांची धावपळ असते. मात्र, धुळवडीच्या दिवशी दुपारच्या वेळी मात्र, कुठलाही तामझाम न घेता ते स्वतच्या गाडीने कुटुंबासह नातेवाईक आणि मित्रमंडळींना होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी निघाले.
शहरात महत्त्वाची किंवा अतिमहत्त्वाची व्यक्ती असली की, सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या मागे सर्व शासकीय तामझाम असतो. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात बैठकीसाछी कालच आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकाळी १० वाजता नागपूरला आगमन झाले. बैठकीला फडणवीस यांना प्रवेश नव्हता. विमानतळावरून मुख्यमंत्री प्रथम रामगिरीला गेल्यावर ते त्या ठिकाणी काही वेळ थांबले आणि त्यानंतर धरमपेठेतील निवासस्थानी आले. तेथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आलेले होते. घरी धुळवडीचा कार्यक्रम झाल्यावर ते नातेवाईक आणि मित्रांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी स्वतची खाजगी गाडी घेऊन निघाले. एरवी मुख्यमंत्री शहरात कुठेही जात असतील तर राजशिष्टाचारानुसार सोबत गाडय़ांचा ताफा आणि सुरक्षा रक्षक सोबत असतात. मात्र, हा सर्व तामझाम बाजूला ठेवून ते गाडी घेऊन बाहेर पडले. मुख्यमंत्री कुठे गेले, याची माहिती पोलिसांनाही नव्हती. मात्र, ते नातेवाईक व मित्रांना धुळवडीच्या शुभेच्छा देण्यासाठी बाहेर गेल्याचे त्यांच्या निवासस्थानी सांगण्यात आले. शहरातील काही भागात आणि स्वतच्या मतदारसंघात ते जाऊन आल्याची माहिती मिळाली.
राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संघाच्या कार्यालयात होते. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी ते खाजगी गाडीने येऊन गेल्याची माहिती मिळाली. मात्र, पोलिसांकडून ते संघ कार्यालयात आले नसल्याचे सांगण्यात आले. सुमारे दोन-तीन तास मुख्यमंत्री कुटुंबासह सुरक्षेच्या दृष्टीने कुठलाही तामझाम न घेता बाहेर पडले आणि नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या भेटीगाठी घेऊन चार वाजताच्या सुमारास पुन्हा घरी परतल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी रविभवनात  बैठकीला ते उपस्थित होते आणि तेथूनच अमित शहा यांच्यासोबत विमानतळाकडे रवाना झाले.