सोमवारी अर्थात २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांनी उद्याच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यात शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतल्या वेस्टइन हॉटेलमध्ये पाचारण केलं आहे. या सर्व आमदारांशी आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद निवडणुकीची अजिबात चिंता वाटत नसल्याचं सांगितलं. तसेच, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांचा उल्लेख करत त्यांचं कौतुक देखील केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“…यालाच लोकशाही म्हणतात”

“उद्याच्या निवडणुकीसाठी मी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आमदारांची बडदास्त निवडणुकीसाठी ठेवावी लागते. तशी ती ठेवली आहे यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, खासदार, नगरसेवक यांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे. उद्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या नंतर हे अजून मोठं चित्र दिसलं पाहिजे. एवढ्या संख्येनं मला आमदार दिसले पाहिजेत. सभांमधून बरंचसं बोलून झालंय. अजूनही बोलण्यासारखं खूप आहे. पण तुमच्यासोबत हा एक दिवस साजरा करावा, असं ठरवलं”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ आठवण

“आपण फाटाफुटीचं राजकारण भोगत आलो आहोत. पण कितीही फाटलं, तरी शिवसेना अजून मजबुतीनं उभी राहिली आहे, हे इतिहासाला आपण दाखवलं आहे. अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते मला आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको”, अशी आठवण देखील त्यांनी सांगितली.

“मला उद्याच्या निवडणुकीची अजिबात चिंता नाही. मी चिंता करत बसलो, तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलंय त्याचा उपयोग काय? हारजीत होतच असते. उद्या तर जिंकणारच आहोत. त्याची चिंता नाही. राज्यसभेच्या निवडणुकीत आपलं एकही मत फुटलेलं नाही. मग फुटलं कोणतं? तोही अंदाज लागला आहे. हळूहळू त्याचा उलगडा होत जाईल. मला फाटाफुटीची शक्यता अजिबात वाटत नाही. आता शिवसेनेत असा गद्दार मनाचा कुणी अजिबात राहिलेला नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत”; शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त संजय राऊतांचा विरोधकांना इशारा

“शहाणपणापुढे माज चालत नाही हे दाखवा”

दरम्यान, शिवसेना आमदार आणि सर्व नेत्यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी उद्याच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठिशी ठामपणे उभं राहाण्याचं आवाहन केलं. ‘उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखवणारी आहे. महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचं आहे. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही हे उद्या दाखवायचं आहे. प्रत्येकाला पर्याय असतो. सत्तेचा माज हवा असेल तर जा भाजपाकडे. पण हे किती दिवस चालणार? आज मी शेर आहे, पण उद्या कुणीतरी सव्वाशेर येणार आहे. आत्ताचं राजकारण हे पावशेर आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray to shivsena mla in westin hotel mumbai mlc election pmw
First published on: 19-06-2022 at 14:00 IST