तीन-चार दिवसांपासून थंडीने हुडहुडी भरलेल्या नाशिक जिल्ह्य़ात रविवारीही हवामानात फारसा बदल झाला नाही. पारा ७.९ अंशावर गेल्याने थंडीचा कडाका अधिकच वाढल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
काही दिवसांपासून ढगाळ हवामान, थंडी आणि पाऊस यांच्या कचाटय़ात जिल्ह्य़ातील पिके सापडली असून याचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसत आहे. शनिवारी पावसाने तडाखा दिल्यानंतर रविवारी पारा अधिकच खाली घसरला. त्यामुळे अनेक बागांमध्ये ऊब निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना शेकोटय़ांचा आधार घ्यावा लागला आहे. काही शेतकऱ्यांच्या बागा ऐन काढणीवर असताना थंडीमुळे अडसर निर्माण झाला आहे. तर, ज्या शेतकऱ्यांची द्राक्ष काढणी लांबणीवर आहे. त्या बागातील द्राक्ष रोगांना बळी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हरभरा तसेच गव्हासाठीही हे हवामान हानीकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.