कोलझर हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

मराठीचा न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. मराठीतून शिक्षण घेऊन यशस्वीरीत्या करिअर घडविता येते

‘मराठीचा न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. मराठीतून शिक्षण घेऊन यशस्वीरीत्या करिअर घडविता येते’, असे प्रतिपादन बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर यांनी केले. येथील समाजसेवा हायस्कूलच्या पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी व ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, मळगाव ऐक्यवर्धक संघाचे सचिव राजाराम राऊळ, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी. एल. मोरे, समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष पी. पी. देसाई, मुख्याध्यापक एस. एन. देसाई, माजी उपसभापती बाबी बोर्डेकर, गुरुनाथ नाईक, माजी मुख्याध्यापक डी. बी. देसाई, श्रीराम गवस, साबाजी सावंत, सुभाष बोंद्रे, माजी सरपंच भाऊ देसाई आदी होते. यावेळी माजी विद्यार्थी देसाई, संस्थेचे तोरसकर व राऊळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तोरसकर म्हणाले, ‘मराठीतून शिक्षण घेऊनही चांगले यश मिळवता येते. आमच्या संस्थेत अशी हजारो उदाहरणे आहेत. यामुळे मराठीचा न्यूनगंड न बाळगता आपली गुणवत्ता सिद्ध करा.’ देसाई म्हणाले, ‘ग्रामीण भागातून शिकूनही वेगवान स्पर्धेला तोंड देता येते. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणारी मुलेच अधिक यशस्वी होतात. यासाठी पारंपरिक शिक्षण न घेता तुमची आवड असणारे क्षेत्र निवडा. नवे काही तरी शोधण्याचा सतत प्रयत्न केल्यास करिअर घडविणे अवघड नाही. स्पर्धा परीक्षांसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करा.’ राऊळ यांनी मराठीतून शिक्षण घेण्याचे आवाहन करत संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचे कौतुक केले. गवस, मोरे यांनीही या वेळी मनोगत मांडले. तोरसकर, देसाई, राऊळ यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. वर्षभरात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या मुलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक देसाई यांनी प्रास्ताविक केले. डांगी, ए. एच. मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. आनंद बोंद्रे यांनी आभार मानले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Coljhar high school gadring

ताज्या बातम्या