scorecardresearch

‘त्या’ ठकसेनांची गय नाही; गृहराज्यमंत्री शंभूराजेंची ग्वाही

सभासदांसह फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पाटण येथे गृहराज्यमंत्री शंभूराजेंची भेट घेऊन घडल्या प्रकाराची व झालेल्या फसवणुकीची माहिती त्यांना दिली.

कराड : ठाणे येथील कालिकाई इंडस्ट्रीज व संपर्क अ‍ॅग्रो मल्टिस्टेट सोसायटी कंपनीने केलेल्या फसवणुकीचा सखोल तपास व्हावा, दोषींवर कठोर कारवाई होताना गुंतवणूकदारांना न्याय मिळावा अशी मागणी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाटण व कराड तालुक्यातील तसेच अन्य ठिकाणांच्या गुंतवणूकदारांनी केली आहे.

   सभासदांसह फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पाटण येथे गृहराज्यमंत्री शंभूराजेंची भेट घेऊन घडल्या प्रकाराची व झालेल्या फसवणुकीची माहिती त्यांना दिली. मंत्री देसाई यांना यावेळी निवेदनही देण्यात आले. शंभूराजेंची फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना दिलासा दिला. ते म्हणाले, कंपनी संचालकांसह गुंतवणूकदारांचे पैसे हडप करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे मिळेपर्यंत पाठपुरावा करू. निवेदनातील माहिती अशी, कालिकाई इंडस्ट्रीज व संपर्क अग्रो कंपनीने आर्थिक गुंतवणुकीवर आकर्षक व्याज परताव्याचे आमिष दाखवून पाटण तालुक्यासह परिसरातील दोन हजार सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. कंपनीने चाफोली रोड पाटण येथे कार्यालय सुरू केले. रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे आमिष दाखवून कमिशनवर गुंतवणूक प्रतिनिधी नेमले.

  सर्वसामान्य लोकांना सभासद करून त्यांच्याकडून तीन, पाच, सात व नऊ वर्षांच्या मुदतीवर व्याज परताव्याचे आमिष दाखवून कोटय़वधी रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून घेतली. २०१३-१४ मध्ये पाटणला स्वमालकीचे चार गाळे खरेदी केले. कंपनीने २०१६-१७ पर्यंत मुदत संपणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे परत केले. कंपनीने २०१७ नंतर संपलेल्या मुदतीचे पैसे द्यायचे बंद केले. कालांतराने कंपनीच बंद केली गेली. त्यामुळे हजारो सभासद गुंतवणूकदार या आर्थिक फसवणुकीत अडकलेत. कंपनीच्या स्वमालकीच्या कार्यालयाचा सन २०२० मध्ये काही स्थानिकांनी कंपनीचे मुख्य संचालक हेमंत रेडीज, अदित्य रेडीज यांना हाताशी धरून व्यवहार केला. त्यातून ४० लाख रुपये आपापसात वाटून घेऊन पुन्हा गुंतवणूकदारांची फसवणूक केली. कंपनीने केलेल्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Company fraudulent investigation strict action against culprits investors justice ysh

ताज्या बातम्या