आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार बग्गुजी ताडाम व त्यांच्या तीन सहकाऱ्यांचे अपहरण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. काँग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम यांचा मुलगा लॉरेन्स आणि त्याच्या साथीदारांनी ताडाम यांच्या पाठलाग करून त्यांचं आणि त्यांच्या साथीदाराचं अपहरण केल्याची घटना घडली. तसंच यामध्ये माजी आमदार आनंद गोडाम यांचादेखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. गेडाम हे स्वतः त्यात सामील होऊन बग्गुजी ताडाम यांना शिवीगाळ आणि मारपीट केली, तसंच प्रचारातून माघार घेण्यासाठी धमकी दिल्याची तक्रार बग्गुजी ताडाम यांनी आरमारी पोलीस स्थानकात नोंदवली आहे.

ताडाम यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार आनंद गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स आनंद गेडाम यांच्यासह पंकज प्रभाकर तुलावी, जीवन नाट आणि इतर अशा एकूण दहा जणांवर अपहरणाचे कलम 365 यासह 341, 342, 392, 143, 147, 37(1),(3) अशी वेगवेगळी कलमे लावून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने आरमोरी विधानसभा क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात अशा प्रकारची अपहरणाची पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बग्गुजी ताडाम हे एकेकाळचे काँग्रेसचे स्थानिक नेते तत्कालीन आमदार आनंद गेडाम यांचे सहकारी होते. त्यांनी आरमोरी पंचायत समितीचे उपसभापती पद सुद्धा उपभोगले आहे. परंतु मधल्या काळात आनंद गेडाम आणि बग्गुजी ताडाम यांच्यात मतभेद झाल्याने त्यांनी गेडाम यांची साथ सोडली. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. ताडाम यांची उमेदवारी ही आपल्याला घातक ठरू शकते हे जाणून आनंद गेडाम यांनी बग्गुजी ताडाम यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी खूप प्रयत्न केला. परंतु त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आनंद गेडाम यांनी बुधवारी आपल्या मुलासह बग्गुजी ताडाम यांच्या अपहरणाचा कट रचला व अपहरण केल्याचे म्हटले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र बग्गुजी यांनी समयसुचकता दाखवत घरी कुटुंबाला मोबाईलवर आपले अपहरण झाल्याची सूचना दिली. बग्गुजी ताडाम यांच्या मुलाने गुरूवारी सकाळी ८ च्या सुमारास सुमारास आरमोरी पंचायत समितीजवळ बग्गुजी ताडाम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन येणारी गाडी थांबविली आणि आपल्या वडिलांसह इतर तीनही सहकार्‍यांची सुटका करून घेतली. यानंतर त्यांनी आरमोरी पोलीस स्थानकात आपली फिर्याद नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनात दिवसभर तपासाची चक्रे हलवीत ही फिर्याद दाखल करून घेतली. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलीस सध्या अधिक तपास करत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.