मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसच्या वतीने सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे दावा करण्यात आला. अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा केला. काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे करण्यात आली.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रा. शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दावा केला. तत्पूर्वी वडेट्टीवार, थोरात यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याची विनंती केली. विधान परिषदेत काँग्रेसचे ७, शिवसेना ठाकरे गटाचे ६ तर राष्ट्रवादीचे (शरद पवार) ३ आमदार आहेत. संख्याबळानुसार परिषदेचे विराेधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी आग्रही आहोत. ठाकरेंसोबत यावर चर्चा झाली असून शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज ठाकरे यांना सहभागी करणार ?

महापालिका निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यास उत्सुक आहेत. ही उत्सुकता त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे बोलून दाखविली. महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना घेण्याबाबत काँग्रेसने सावध भूमिका घेतली असून यासंदर्भात दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असा पवित्रा काँग्रेसकडून घेण्यात आला आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, आमदार अमिन पटेल यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी महापालिका निवणुकींसंदर्भात चर्चा झाली. यावेळी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसे युती करण्याचा मानस उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. मात्र यावर काँग्रेसकडून विशेष कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. याविषयीची माहिती देताना यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. यावर दिल्लीतील वरिष्ठांशी देखील आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर आम्हाला अधिक भाष्य करता येईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

राज ठाकरे सोबत आल्यास काँग्रेसचे जे पारंपरिक मतदार आहेत ते नाराज होतील, अशी भूमिका या बैठकीत काँग्रेस नेत्यांकडून मांडण्यात आली. त्याचा फटका पारंपरिक मतदारसंघात बसण्याची शक्यता काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली. त्यामुळे मुंबई महापालिकेत आघाडी करण्यास काँग्रेस फारशी इच्छूक नसल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. महापालिका एकत्र न लढवायची झाल्यास काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात शिवसेनेने (ठाकरे) मैत्रीपूर्ण लढत करावी, अशीही चर्चा या बैठकीदरम्यान करण्यात आली.