देशातील सोळा लोकसभा मतदारसंघात पक्षश्रेष्ठींऐवजी कार्यकर्त्यांमार्फत उमेदवार ठरवण्याच्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रयोगाबद्दल काँग्रेसमध्ये कमालीची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. उमेदवार निवडीसाठी स्थापन होणाऱ्या निर्वाचक मंडळात कोणाचा समावेश असेल अर्थात, मतदार कोण असतील, आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणते निकष असतील, याबद्दल काहीही स्पष्ट झाले नाही. कोणत्याही नेत्याला किंवा कार्यकर्त्यांला याबद्दल कल्पना नाही. शिवाय, या पद्धतीमुळे पक्षांतर्गत गटबाजी मोठय़ाप्रमाणात निर्माण होणार असल्याची आणि या प्रक्रियेत पराभूत झालेल्या उमेदवाराचे उपद्रवमूल्य वाढवण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
ज्या १६ लोकसभा मतदारसंघात हा आगळावेगळा अमेरिकन स्टाईल प्रयोग होत आहे त्यात महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि यवतमाळ-वाशीम या दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यवतमा़ळ-वाशीमचा या पद्धतीत समावेश करण्याचा आग्रह खुद्द प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राहुल गांधींजवळ धरला असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, मध्यप्रदेशातील मनसौरच्या काँग्रेस खासदार मीनाक्षी नटराजन यांचा अपवाद वगळता एकाही मतदारसंघात काँग्रेसचा उमेदावर निवडून आलेला नाही, असे हे मतदारसंघ आहेत. ज्या १५ मतदारसंघांची या प्रयोगासाठी निवड झाली आहे त्यात झिंझीणू, बिकानेर, उत्तर कोलकाता, गुवाहाटी, भावनगर, वडोदरा, उत्तर बंगळुरू, संत कबीरनगर, वाराणशी, मंदसौर यांच्यासह महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि यवतमाळ-वाशीम या दोन मतदारसंघांचा समावेश आहे.